संदीप झिरवाळ ।पंचवटी : गेल्या काही वर्षांपूर्वी ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा बाजारभाव गाठणाऱ्या टमाटा मालाला नाशिक बाजार समितीत प्रति २० किलो जाळीला केवळ ४० रुपये (२ रुपये प्रतिकिलो) असा मातीमोल बाजारभाव मिळत असल्याने नाशिक परिसरासह जिल्ह्यातील शेकडो टमाटा उत्पादक शेतकºयांनी नाराजी व्यक्त केली आहे. गुजरातसह अन्य राज्यांत स्थानिक टमाटा माल सुरू झाल्याने तसेच राज्यातील काही जिल्ह्यातील टमाटा मुंबई व उपनगरात मोठ्या प्रमाणात विक्र ीसाठी दाखल होत असल्याने बाजारभाव कोसळले असल्याचे व्यापाºयांनी सांगितले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून टमाटा मालाला २ ते ३ रुपये किलोच्या पुढे बाजारभाव नसल्याने काही टमाटा उत्पादक शेतकºयांनी टमाटा खुडणे बंद करून टमाट्याचे उभे पीक जनावरांसाठी सोडून दिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील काही ठिकाणच्या भागात नाशिकच्या बाजार समितीतून पाठविल्या जाणाºया टमाटा मालाची निर्यात थांबली आहे. तर गेल्या वर्षभरापासून भारत-पाकिस्तान बॉर्डर बंद असल्याने नाशिकच्या बाजार समितीतून पाकिस्तान, बांगलादेशात टमाटा माल पाठविणे बंद केले आहे. सध्या गुजरात राज्यातील वापीपर्यंत टमाटा माल जात आहे. याशिवाय मुंबईकडे घोटी, नाशिक, वाडा परिसरातून टमाटा मालाची निर्यात केली जात आहे. व्यापारी वर्गाकडून टमाटा खरेदी केला जात असला तरी टमाटा मालाला उठाव कमी असल्याने खरेदी करायला कोणी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. नाशिक बाजार समितीत काही दिवसांपासून टमाट्याच्या २० किलो जाळीला ४० ते ६० रुपये असा अत्यल्प बाजारभाव मिळत आहे. योग्य बाजारभाव मिळत नाही तसेच लागवड व दळणवळण खर्च निघत नसल्याने टमाटा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. किरकोळ व आठवडे बाजारात १० रुपयांत दीड ते दोन किलो दराने ग्राहकांना टमाटा उपलब्ध होत आहे.
नाशिक बाजार समितीत टमाटा २ रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 1:04 AM