एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी सध्या टमाटे लागवडीत व्यस्त आहेत. गेल्यावर्षी कोरोनाच्या भीतीपोटी शेतकऱ्यांनी कमी प्रमाणात लागवड केली होती. मात्र यंदा टमाटा लागवडीचे क्षेत्र वाढले आहे.
तालुक्यातील पूर्व भागातील एकलहरे, सामनगाव, चाडेगाव, कोटमगाव, मोहगाव, बाभळेश्वर, जाखोरी, चांदगिरी, हिंगणवेढे या परिसरातील शेतकरी सिंजेंटा, अनीषा, आर्यमान, अस्टेन केशर आदी प्रकारच्या टमाटा पिकाचे उत्पादन घेतात. खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात लागवड केली जाते. लागवडीपूर्वी जमीन उभी-आडवी खोलवर नांगरून, त्यात शेणखत पसरून सऱ्या केल्या जातात. त्यावर ठिबक सिंचनच्या नळ्यांद्वारे पाण्याची व्यवस्था केली जाते. सध्या कोरोनामुळे शेतीच्या कामासाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे कुटुंबातील लहानमोठे सर्वच सदस्य शेतात राबताना दिसतात. काही शेतकरी रोपवाटिकेतून ऑर्डर देऊन रोपे आणतात, तर काहींनी आपल्या शेतातच रोपवाटिका उभारून रोपे तयार केलेली आढळून येतात. एकरी सुमारे आठशे ते हजार रोपांची लागवड केली जाते, असे हिंगणवेढे येथील शेतकरी साहेबराव धात्रक यांनी सांगितले.
कोट==
पाण्याचा निचरा असलेल्या मध्यम काळ्या जमिनीत किंवा पोयट्याच्या जमिनीत टमाटा पीक चांगले येते. हलक्या जमिनीत पीक लवकर निघते. पावसाळी टमाटे लागवडीसाठी काळीभोर जमीन शक्यतो टाळावी व उन्हाळी टमाटे पीक हलक्या व उथळ जमिनीत घेऊ नये.
-संपत धात्रक, शेतकरी, हिंगणवेढे.
----
कोट-==
शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या टमाट्यांची रोपे रोपवाटिकेत तयार करून दिली जातात. एका काडीस सव्वा ते दीड रूपयांनी विक्री केली जाते. काही शेतकरी स्वतःच्या शेतातच रोपे तयार करतात, मात्र बहुतांश शेतकरी रोपवाटिकेतून तयार केलेली रोपे नेऊन लागवड करतात. गेल्या वर्षीपेक्षा यंदा दुपटीने टमाटे लागवडीचे शेतकऱ्यांचे नियोजन आहे.
-बबनराव कांगणे- संचालक, कांगणे हायटेक नर्सरी
(फोटो २८ टमाटे)