श्याम बागुल, नाशिक: चालू वर्षी टोमॅटो पिकाचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केल्याने बाजार समितीत टोमॅटो मानाची प्रचंड आवक वाढली होती. परिणामी टोमॅटो मालाला उठाव नसल्याने बाजार भाव दीड ते दोन रुपये प्रति किलो आलेले होते. मात्र आता टोमॅटो उत्पादन घटल्याने व त्यातच शेतमालाला पाणी कमी पडत असल्याने टोमॅटो मालाला बाजारभाव वाढला आहे. सोमवारी (दि.१९) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलाव प्रक्रियेत २० किलो ग्रेटला तब्बल ९०० रुपये असा बाजारभाव मिळाला.
तब्बल दीड ते दोन महिन्यानंतर टोमॅटो मालाला उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. काही महिन्यांपूर्वी टोमॅटो उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाची लागवड केली होती पुरेसा पाणीपुरवठा पोषक हवामान यामुळे मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे उत्पादन झाले होते मात्र टोमॅटो खरेदीसाठी व्यापारी पुढे येत नसल्याने बाजारभाव कोसळले होते. त्यावेळी शेतकऱ्यांना एक ते दीड रुपया प्रति किलो असा बाजार भाव मिळाल्याने पेठरोड बाजारसमिती बाहेर शेतकऱ्यांनी टोमॅटो फेकून आंदोलन देखील केले होते.