शेतमालास योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी वर्ग आधीच त्रस्त आहे. टमाटा, मिरची, शिमला मिरची, कोबी फ्लॉवर, कारले, भोपळा, भेंडी व इतर भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागला. कवडीमोल दरामुळे केलेल्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने तोटाच सहन करावा लागत असल्याने शेतकऱ्यांनी उभ्या भाजीपाला पिकात जनावरे सोडली तर काहींनी पिकात रोटर फिरवून आपला संताप व्यक्त केला आहे. आता तर कांद्याचे दरही दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गावर चिंतेचे सावट पसरले असून, तो पूर्णतः हवालदिल झाला आहे. बाजार समित्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीत आवक कमी होऊनही दर कमी होत आहे .
पिकांना मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग शेतमालाला उत्पादन खर्चावर भाव मिळावा म्हणून ओरड करीत आहे मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशाही स्थितीत या पिकात नाही, तर दुसऱ्या पिकात झालेले नुकसान भरून निघेल या आशेवर शेतकरी विविध पिके शेतात घेत आहेत मात्र कोणत्याच पिकास भाव मिळत नसल्यामुळे आर्थिक गणित कोलमडत असून, शेतकरी देशोधडीला लागला आहे.
कांद्याचे आगार असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी साठ ते सत्तर हजारांपेक्षा जास्त खर्च करून मोठ्या आशेने पिकविलेल्या कांद्यास कमी भाव मिळत आहे. सरासरी एक एकर शेतात पिक चांगले आल्यास चार ट्रॅक्टर कांद्याचे उत्पन्न मिळते. एका ट्रॅक्टरमध्ये सरासरी पंधरा क्विंटल कांदा असतो. आजच्या बाजार दरानुसार शेतकऱ्यांना फक्त एकरी तीस ते चाळीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असल्याने मोठा आर्थिक फटका बसत आहे.
कांद्याच्या या आगारामध्ये शेतकऱ्यांनी नवीन प्रयोग करीत भाजीपाला पिके घेतली मात्र त्यांनाही बाजारात भाव मिळत नसल्याने भाजीपाला शेळ्या, मेंढ्या व जनावरांना खाऊ घातला आहे. अनेक शेतकऱ्यांनी बाजारात नेलेली भाजी जनावरांच्या पुढे टाकून देण्याची वाईट वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
कोट...
बाजारभाव वाढतील व शेतीस भांडवल उपलब्ध होईल म्हणून चाळीत साठवून ठेवलेला सुमारे दोनशे क्विंटल कांदा खराब झाल्याने उकिरड्यावर फेकून द्यावा लागला. त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांना सावरण्यासाठी खराब कांद्याचा पंचनामा करून आर्थिक मदत करावी .
- अमोल गायकवाड, धुळगाव
कोट...कांदा उत्पादन घेण्यासाठी एकरी एक लाखापर्यंत खर्च केला. बियाणातही भेसळ निघाल्याने संपूर्ण पिकाला डोंगळे निघाले. पुढील काळात दर वाढतील म्हणून कांदा चाळीत साठवून ठेवला, मात्र कांदा खराब झाला आहे. तसेच सध्या बाजारात मिळत असलेल्या दराने उत्पादन खर्चही निघत नसल्याने कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा.
- भास्कर शेळके, ठाणगाव
फोटो - १० पाटोदा १
100921\10nsk_34_10092021_13.jpg
ठाणगाव येथे कांदा चाळीत खराब झालेला कांदा.