नाशिक : सर्वत्र परमात्मा पाहण्याची शिकवण देणाऱ्या हिंदू समाजात माणसालाच कनिष्ठ वागणूक दिली जात असल्याने या समाजाचे प्रबोधन होण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्वाधिक चिंतित होते, असे प्रतिपादन महाराष्ट्र सामाजिक समरसता मंचचे सहनिमंत्रक प्रा. रमेश पांडव यांनी केले. भारतातील बहुसंख्य हिंदू समाजाने ‘सामाजिक एकात्मता’ समजून घेतली तरच येथे धर्मनिपेक्ष घटनेची दीर्घकाळ अंमलबजावणी शक्य असल्याचे बाबासाहेबांनी ओळखले होते. त्यामुळेच हिंदू समाज आणि हिंदूचे शिक्षण हा त्यांच्या चिंतेचा विषय बनला होता, असे मत पांडव यांनी व्यक्त केले. संस्कृती जागरण मंडळ पुणे व शंकराचार्य न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य संकूल येथील डॉ. कुर्तकोटी सभागृहात शनिवारी (दि.२८) सांस्कृतिक वार्तापत्र, पुणे यांच्यातर्फे ‘राष्ट्रभक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. व्यासपीठावर शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष आनंद जोशी, भदन्त ग्यानजगत महास्यवी, मानवधन संस्थेचे प्रकाश कोल्हे उपस्थित होते. याप्रसंगी पांडव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करताना ‘लष्कराच्या छावणीत जन्मलेल्या या योद्धाने जीवनभर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला’ असे गौरवोद्गार काढले. ज्या महापुरुषाचे काळाराम मंदिरात स्वागत करायला हवे होते, आमंत्रित करून गोड तळ्याचे पाणी द्यायला हवे होते. त्यांना सामाजिक शिक्षणाच्या अभावामुळे या गोष्टी मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. परंतु,याठिकाणी विरोध करणाऱ्या सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांना मान्य केल्याचे त्यांनी सांगितले. पांडव यांनी हिंदू समाजाच्या परंपरांविषयी बोलताना विविध ऋषींच्या कुळांचा उल्लेख करताना त्यांनी ज्याप्रमाणे ज्ञानाच्या जोरावर वंश परंपरेवर मात केली. त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही समाजातील अनिष्ठ प्रथा, परंपरांच्या विरोधात ज्ञानाचा संघर्ष करीत समाजाला न्याय मिळविण्यासाठी लढा उभाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक दिलीप शेटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. नागमोती यांनी केले. (प्रतिनिधी)
हिंदू समाज बाबासाहेबांच्या चिंतेचा विषय : रमेश पांडव
By admin | Published: January 29, 2017 12:24 AM