नाशिक : शहर व परिसरात बुधवारी (दि.२५) दुपारपासून रात्रीपर्यंत जोरदार पाऊस झाला. पाणलोट मुक्त क्षेत्रातून गोदावरीत रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे १० हजार क्यूसेक पाणी आल्याने दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली तसेच गंगापूर धरणातूनदेखील विसर्ग वाढविण्यात आल्याने गोदावरीला पुन्हा पूर आला. या हंगामात आॅगस्ट महिन्यात महापुरानंतर दुसऱ्यांदा गोदावरीला पूर पहावयास मिळाला.शहरात दुपारी तीन वाजेपासून ढगाळ हवामान निर्माण झाले. त्यानंतर काही मिनिटांतच दमदार सरींचा वर्षाव सुरू झाला. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ६ मि.मी. तर रात्री ८.३० वाजेपर्यंत शहरात २९ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी एकूण ३५ मि.मी. पाऊस शहरात झाल्याचे हवामान निरिक्षण केंद्रकडून सांगण्यात आले. सायंकाळी ७ वाजेपासून गंगापूर धरणातून विसर्ग करण्यास सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात १ हजार १४२ क्युसेकेचा विसर्ग केला गेला. दीड तासानंतर विसर्गात वाढ करण्यात येऊन १ हजार ७१३ क्युसेकपर्यंत विसर्ग गोदापात्रात करण्यात आला.नासर्डी दुथडी भरून वाहिलीसिडको, सातपूर, इंदिरानगर भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे नंदिनी (नासर्डी) नदीला पूर आला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिडके कॉलनी भागातील मिलिंदनगर येथील पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहू लागले होते. तसेच रात्री आठ वाजेच्या सुमारास वडाळारोडवरील भारतनगर येथील नासर्डीच्या पुलाला पाणी लागले.४या भागातील नैसर्गिक नालेदेखील ओसंडून वाहू लागल्याचे चित्र होते. नासर्डी नदीला पूर आल्याने शिवाजीवाडी, भारतनगर, मिलिंदनगर, पखालरोड आदी नदीकाठालगतच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.गंगापूर पाणलोट क्षेत्रात जोरगंगापूर धरणाच्या परिसरात सायंकाळपर्यंत १०२ तर पाणलोट क्षेत्रातील कश्यपी परिसरात ८४ मि.मी. पावसाची नोंद झाली. धरणात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागल्याने सायंकाळी सात वाजता धरणातून १ हजार १४२ क्यूसेक इतका विसर्ग केला गेला. धरण १०० टक्के भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. तसेच आळंदी धरणातूनही ८६ क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे.
मुसळधार पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 1:50 AM