त्र्यंबकेश्वर परिसरात तीन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. येथील निसर्गसौंदर्य बहरले आहे. पोलिसांनी या भागातील पर्यटन केंद्रांवर येण्यास पर्यटकांना मज्जाव केला आहे. वीकेंडला या भागात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यामुळे बहुतांश पर्यटकांना पोलिसांकडून माघारी धाडले जात होते. पोलिसांची नजर चुकवीत पंचवटी भागातील संशयित रोहित आनंद म्हसदे (वय २५, रा. फुलेनगर, पंचवटी) हा एका अल्पवयीन मुलीला फूस लावून त्र्यंबकेश्वरला फिरून येण्याच्या बहाण्याने घेऊन गेला. फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलगी आणि संशयित रोहित हा एकाच ठिकाणी कामाला असल्याने ते एकमेकांच्या परिचित असल्याचे पोलिसांनी सांगितले. रोहित याने त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचल्यानंतर येथील एका हॉटेलवजा लॉजमध्ये अल्पवयीन मुलीला घेऊन जात तिला शीतपेय पाजण्याचा बनाव करत त्यामध्ये गुंगीचे औषध टाकून तिच्याशी बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित रोहितविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोस्को) अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला उपनिरीक्षक डी. एस. पाटील करीत आहेत.
शीतपेयातून गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:11 AM