सिडको : अल्पवयीन शाळकरी मुलींना अश्लील चित्रफीत दाखवून स्कूल व्हॅनचालकानेच अत्याचार केल्याचा प्रकार सिडको परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी स्कूल व्हॅनचालक किशोर देवकर (२१, रा़ बजरंगवाडी, पांडवलेणे) याच्या विरोधात विनयभंग तसेच पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित स्कूल व्हॅनचालक देवकर हा सिडको परिसरातील मुलींना शाळेत सोडण्याचे काम करतो़ त्याच्या व्हॅनमध्ये अनेक शाळांमधील मुली असून, गत सहा महिन्यांपासून तो सातवी व दहावीमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना गंगापूररोड परिसरात घेऊन जात असे़ या ठिकाणी तसेच व्हॅनमध्ये या मुलींना मोबाइलवर अश्लील फोटो तसेच व्हिडीओ दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होता़ गत अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा प्रकार मुली पालकांना सांगण्यास घाबरत होत्या़ मात्र, त्यांनी पालकांना ही बाब सांगितल्यानंतर पालकांनी देवकर याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ दरम्यान, आणखी एका घटनेत पैशाचे आमिष दाखवून पाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून संशयित विद्यासागर पाटील ( ३३, पाटीलनगर, सिडको) या संशयितावर गुन्हा दाखल केला आहे़सिडकोतील पाटीलनगर परिसरातील संशयित विद्यासागर पाटील (३३) याने एका पाचवर्षीय चिमुरडीस पैशाचे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार घडला आहे़ या मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे़
अश्लील चित्रफीत दाखवून स्कूल व्हॅनचालकाचा विद्यार्थिनींवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 1:29 AM