देवळाली कॅम्प- देवळाली कॅम्प येथील स्कूल ऑफ आर्टिलरी परिसरात लष्करी अधिकारी असल्याचे सांगून फिरणाऱ्या एका तोतया व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लष्कराच्या संवेदनशील हद्दीतच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. २८) रात्री ही घटना घडली. आर्मी इंटेलिजन्स ब्युरोच्या पथकाने या इसमाला ताब्यात घेतले. त्याचे नाव गणेश वाळू पवार (वय २६) असून चांदवड तालुक्यातील हरसूल येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, तो नांदुकरनाका येथे पूर्वी राहत असल्याचे त्याने पेालिसांना सांगितल्यानंतर त्या भागातही पोलीस रवाना झाले होते. त्याच्याकडे संरक्षण खात्याचे कँटीन कार्ड तसेच सैन्याचा गणवेश आढळला असून, त्याच्या गाडीवरही लष्कराचा लोगो आढळला आहे. याच परिसरात फिरत असताना त्यास ताब्यात करण्यात आले. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात त्याला नेल्यानंतर त्याची चौकशी सुरू होती. लष्कराच्या हद्दीत लष्कराचा गणवेश घालून तो फिरत असताना त्याच्याविषयी अधिकाऱ्यांचा संशय बळावला. त्यामुळे त्याला थांबवून अधिकाऱ्यांनी चौकशी केली असताना बिंग फुटेल अशी माहिती देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुंदन जाधव यांनी दिली. त्याचा उद्देश काय होता आणि तो नक्की काय करत होता, याची माहिती घेण्याचे आणि गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरू होते. दरम्यान, आर्टिलरी सेंटरचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यापूर्वीही अनेक जण संशयास्पदरीत्या येथे आढळले होतेे, तसेच दोन-तीन वर्षांपूर्वीसुद्धा याच परिसरात एक जण चित्रीकरण करताना आढळला होता.
आर्टिलरी सेंटरमध्ये तोतया अधिकाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 1:09 AM