साकोरा : पोलीस असल्याचे सांगत भररस्त्यात झडती घेण्याचा बहाणा करून रोख ८० हजार रुपयांची रोकड लुटणाऱ्या दोन संशयितांना नांदगाव पोलिसांनी पाठलाग करून अटक केली. अटकेतील दोघे संशयित भिवंडी येथील असून अन्य दोन साथीदार रोकड घेऊन फरार झाले आहेत. हा प्रकार मंगळवारी (दि.७) भरदुपारी नांदगाव - औरंगाबाद रस्त्यावरील म्हसोबा बारीत घडला. मात्र चार पैकी दोघे संशयित रक्कम घेऊन फरार केले, की फरार झाले याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत माहीती अशी की, मेंढपाळ व्यावसायिक सुरेश चव्हाण हे औरंगाबाद रोडवर मेंढ्या चारत असतांनाच चार अनोळखी व्यक्ती दोन मोटारसायकलवरून जवळ आले. त्यांनी पोलीस असल्याचे सांगून तुझी झडती घ्यायची आहे असे सांगितले. बळजबरीने चव्हाण यांच्या खिशात हात घालून ८० हजार रूपये काढून घेत पोबारा केला. त्यानंतर चव्हाण यांनी त्यांचा मुलगा आकाश याला घटनेची माहीती देताच आकाशने दुचाकींचा पाठलाग करत रेल्वे बोगद्याजवळ या संशयितांना आडविण्याचा प्रयत्न केला. मात्र संशयितांनी चाॅपरचा धाक दाखवून पळ काढला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच नाकाबंदी करत मनमाड रोडवर क्रांतीनगर भागात संशयितांना घेरले, मात्र या चौघांनी दुचाकी सोडून शेतातील उभ्या पिकांच्या आसरा घेत पलायन केले. त्या नंतर पोलिसांनी उपस्थित नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून अमजद अली बरकतअली बेग व बरकत सैफ उरला जाफरी या दोघांना पकडले, मात्र इतर दोघे फरार झाले.
पकडलेले संशयित भिवंडी शहरातील असून पोलिसांनी दोघांना अटक करून त्यांच्याजवळील दोन मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत. मात्र इतर दोघे रक्कम घेऊन पायी कसे काय फरार झाले, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.