नाशिक : गेल्या आठवड्यात पदोन्नतीसाठी तालुका सोडण्यास तयार नसल्याचे सांगून थेट प्रशासनालाच आव्हान देण्याच्या तयारीत असलेले ताठर ग्रामसेवक अखेर नरमले असून, जिल्हा परिषद प्रशासन घेईल त्या निर्णयाशी सहमती दर्शवून तालुक्याबाहेर बदलून जाण्याची व पदोन्नती घेण्यास तयार झाले आहेत. मंगळवारी (दि. ३) या संदर्भात ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या दालनात ग्रामसेवक संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली, त्यात ग्रामसेवकांनी आपला होकार कळविला आहे. जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करतानाच ग्रामसेवकांच्याही बदल्या करण्याची तयारी प्रशासनाने गेल्या आठवड्यात सुरू केली होती. या तयारीचाच भाग म्हणून सुमारे ५० ग्रामसेवकांना ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती देऊन नंतर बदल्या करण्यात येणार होत्या. या पदोन्नतीसंदर्भात बैठक सुरू असताना प्रशासनाने ग्रामसेवकांना पदोन्नतीबरोबरच त्यांच्या तालुक्याबाहेर समुपदेशनाने बदली करण्याची कार्यवाही सुरू करताच, ग्रामसेवक संघटनांनी त्यास विरोध दर्शविला व पदोन्नती नको, बदल्याही नको अशी ताठर भूमिका घेतली होती. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मात्र दहा वर्षांपासून एकाच तालुक्यात बसलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या केल्याशिवाय पदोन्नती होणार नाही अशी भूमिका घेतली होती. ग्रामसेवक संघटनेच्या ताठर भूमिकेमुळे प्रशासनानेही एकाच तालुक्यात दहा वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या ग्रामसेवकांची माहिती संकलित करण्याची तयारी सुरू केली होती व अशा ग्रामसेवकांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्याचा इरादा बोलून दाखविला होता. त्यामुळे ग्रामसेवकांचा ताठरपणा कोलमडला. प्रशासनाकडून अशा काही निर्णयाची अंमलबजावणी होण्यापूर्वीच त्यांनी पदोन्नतीसाठी तालुका बदलून जाण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे मंगळवारपासून ग्रामपंचायत विभागाने याबाबतची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे.
ताठर ग्रामसेवक पदोन्नतीसाठी नरमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2021 1:41 AM
गेल्या आठवड्यात पदोन्नतीसाठी तालुका सोडण्यास तयार नसल्याचे सांगून थेट प्रशासनालाच आव्हान देण्याच्या तयारीत असलेले ताठर ग्रामसेवक अखेर नरमले असून, जिल्हा परिषद प्रशासन घेईल त्या निर्णयाशी सहमती दर्शवून तालुक्याबाहेर बदलून जाण्याची व पदोन्नती घेण्यास तयार झाले आहेत.
ठळक मुद्देतालुका सोडण्यास तयार : प्रशासन लागले तयारीला