नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी आठवडाभर अगोदरच नाशिकच्या दोन दिवसीय मुक्कामी येऊन कार्यकर्त्यांचा कल जाणून घेतानाच, मित्रपक्ष कॉँग्रेस व जनभावनाचा कानोसा घेणारे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार हे नाशिक व दिंडोरी या दोन लोकसभा मतदारसंघाच्या संभाव्य उमेवारांच्या नावाची घोषणा करण्याची व्यक्त होणारी शक्यता फोल ठरली आहे. पवार यांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांना मंत्र दिला, परंतु उमेदवार कोण असेल याविषयी कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम कायम ठेवून आपल्या स्वभावाला साजेसे सर्वच इच्छुकांना झुलवत ठेवले आहे. पवार यांच्या दौऱ्यात सहभागी नेत्यांनाही संभाव्य उमेदवाराच्या नावाची भणक न लागू देण्याची काळजी घेणाऱ्या पवार यांनी मात्र छगन भुजबळ यांच्या पाठीशी ताकद उभी करा, असे स्पष्टपणे सांगून एकप्रकारे उमेदवारीचा निर्णय भुजबळ यांच्यावरच टाकून आपली मान सोडून घेतल्याचे मानले जात आहे.
शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेविषयी कोणीही अंदाज बांधू शकत नाही हे नव्याने सांगण्याची गरज नसली तरी, आता मात्र निवडणूक ऐन तोंडावर आल्यामुळे सर्व विरोधी पक्षांना बरोबर घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्यामागे पवारांचे गणित विद्यमान सत्ताधाऱ्यांना हटविण्याचे आहे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत स्वकीयांची असो वा मित्रपक्षाची ती निवडून आली पाहिजे याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. अशा परिस्थितीत नाशिक जिल्ह्यातील दोन्ही लोकसभेच्या जागा राष्टÑवादीच्या वाट्याला आलेल्या असल्यामुळे शरद पवार यांची भूमिका उमेदवार ठरविण्यासाठी महत्त्वाची असल्याचे मानूनच त्यांच्या दोन दिवसीय दौ-याचे आयोजन करण्यात येऊन पवार यांनी चांदवड व नाशिक या दोन्ही ठिकाणी जाहीरसभा घेऊन जनमताचा कानोसा व कार्यकर्त्यांचा उत्साह जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु उमेदवार कोण हे जाहीर न करण्याची पुरेपूर काळजी घेतली. मुळात या दौ-यातच पवार उमेदवाराच्या नावाच्या घोषणा करून उमेदवारांना तयारीची संधी देतील, असा अंदाज बांधला जात होता. परंतु यापैकी काहीच झाले नाही. चांदवडच्या सभेत दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा, तर नाशिकच्या सभेत नाशिक लोकसभेच्या उमेदवाराचा त्यांनी अंदाज घेण्याचे काम केले. तसेही नाशिक लोकसभेसाठी भुजबळ कुटुंबीयांतील व्यक्तीखेरीज दुसरा कोणी उमेदवार नसेल हे स्पष्टच आहे, परंतु दिंडोरीच्या उमेदवारीबाबत पवार यांनी मौन पाळून इच्छुकांना अंदाज बांधण्यास मोकळीक दिली आहे. डॉ. भारती पवार यांच्या नावाची आजवर होणारी चर्चा धनराज महाले यांच्या राष्टÑवादी प्रवेशाने काहीशी मागे पडली तसेच भुजबळ कुटुंबीयांतील उमेदवारीबाबतही झाले आहे. समीर भुजबळ यांनी उमेदवारी निश्चित मानून तयारीला सुरुवात केली असली व त्याला छगन भुजबळ यांचा पाठिंबा असल्याचे वरकरणी दिसत असले तरी, स्वकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा कल छगन भुजबळ यांच्या बाजूनेच अधिक आहे याचा अंदाज पवार यांनी गेल्या दोन दिवसांत बांधला असावा. या दोन दिवसांत छगन भुजबळ व समीर भुजबळ यांनी पवार यांचे सारथ्य करण्याचे काम केले, त्यातही समीर भुजबळ यांनीच पवार यांच्या दौºयाचे नियोजन केलेले असल्यामुळे समीर यांच्या नावाची पवारांकडून घोषणा होईल, असे मानले जात होते. परंतु पवार यांनी नाशिकच्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना छगन भुजबळ यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत्व सोपविल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता शरद पवार यांनी जिल्ह्यातील दोन्ही जागांबाबत उमेदवार कोण हे जाहीर केले नसले तरी, ते जाहीर करण्यात भुजबळ हेच महत्त्वाची भूमिका बजावतील हे निश्चित.