कोरोनाच्या लाटेमुळे सर्वच सण-उत्सवांचा रंग फिका पडला होता. दुसरी लाट नियंत्रणात आल्यानंतर पहिला सण रक्षाबंधन नागरिकांनी शहर व परिसरात उत्साहात साजरा केला. माहेरवाशिणींनी भाऊरायाला ओवाळण्यासाठी घर पूर्वसंध्येलाच गाठले होते. सकाळी भाऊरायाला ओवाळल्यानंतर सहकुटुंब नागरिकांनी शहराजवळच्या मिसळ पॉईंटसह निसर्गरम्य ठिकाणी भेटी देत ‘आऊटिंग’चा आनंद लुटत कोरोनाकाळात आलेला क्षीण घालविण्याचा प्रयत्न केला. शनिवारी दुपारी अडीच वाजेपर्यंत झालेला मुसळधार पाऊस अन् रात्रीपर्यंत चाललेली रिपरिप यामुळे जनजीवन विस्कळीत झालेले होते; मात्र रविवारी पहाटेपासूनच पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे पर्यटनाची संधी नाशिककरांनी साधली.
दुधस्थळी (सोमेश्वर) धबधबा शनिवारच्या पावसामुळे चांगलाच वेगाने कोसळत असल्याने नाशिककरांनी या ‘डेस्टिनेशन’ला नेहमीप्रमाणे मोठी पसंती दिल्याचे चित्र पाहावयास मिळाले तसेच पांडवलेणी परिसर, गंगापूर धरण, काश्यपी धरण, चामरलेणी, खंडोबा टेकडीसह अंजनेरी, पेगलवाडी, पहिने, ब्रह्मगिरीच्या परिसरात नागरिकांनी भेटी देत पावसाळी पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटला. सुटीचा वार, रक्षाबंधनाचा सण यामुळे पोलिसांनीदेखील पर्यटनस्थळांवरील गर्दीकडे कानाडोळा केला.
--इन्फो---
गोदाकाठही गजबजला
रविवारी संध्याकाळी शहरातील रामकुंड परिसरात गोदाकाठीदेखील नागरिकांनी भेट देत नदीकाठी रम्य संध्याकाळ अनुभवली. विविधप्रकारचे ‘चॅट’ खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. नदीकाठावर फोटोसेशन करत मौजमजा करताना नाशिककर दिसून आले.