घोटी : नाशिक तसेच नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर इगतपुरी तालुक्यातील पर्यटन स्थळी, गड, किल्ले, धरणाचा परिसर, सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये जाणार असाल तर सावधान. कारण गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे ही पर्यटनस्थळे बंद असून, या मानवी वावर कमी झाल्याने हिंस्र श्वापदांचा संचार वाढला आहे, तर अनेक ठिकाणी झाडी वाढून वाटा बंद झाल्या आहेत. त्यामुळे पावसाळी पर्यटनाला जाताना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
नाशिक-नगरच्या सरहद्दीवरील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये गिर्यारोहकांसाठी आवडीचे किल्ले आहेत. त्यात अलंगगड, मदनगड, कुलंगगड यांचेसह
हरिहरगड, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई, त्रिंगलवाडी किल्ला, विश्रामगड, औंदागड, कावनई किल्ला, भास्करगड, बितनगड, मोरधन, बळवंतगड या प्रमुख किल्ल्यांचा समावेश आहे. या किल्ल्यांवरील वनराई दोन वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या ठिकाणचे रस्ते निसरडे झाले आहेत. झाडी वाढल्याने वाटा बंद झाल्या असल्याने किल्ले, शिखर सर करणे धोक्याचे बनले आहे.
लॉकडाऊनमुळे घरातच बसून कंटाळा आलेल्या पर्यटकांना आता इगतपुरीचा परिसर खुणावू लागला आहे. इगतपुरी तालुक्यासह नगर जिल्ह्यातील भंडारदरा, ठाणे जिल्ह्यातील विहीगाव येथील अशोका फॉल्स, इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा, काळुस्ते धरण, भाम धरण, वैतरणा धरण, कसारा घाट अशा विविध ठिकाणी पर्यटकांचा ओघ मोठ्या प्रमाणात असतो.
शनिवार, रविवार विकेंडला ठाणे, मुंबई, नाशिक, नगर जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात. या पर्यटन स्थळावर कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांनी नाकाबंदी केली असली तरी छुप्या मार्गाने पर्यटक जात आहेत; परंतु पर्यटन स्थळावरील धबधबे, धरण स्थळावरील जमीन दलदलीची झाली असल्याने धोके वाढले आहेत. तलाव, धरणांचे किनाऱ्यावर पाण्याचा अंदाज येत नसल्याने मोठ्या संकटांना सामोरे जावे लागू शकते. येणाऱ्या पावसाळ्यात पर्यटनस्थळी स्वतःला व कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी पाण्यामध्ये, जंगलात न उतरण्याचा सल्ला वन विभागाचे अधिकारी व गिर्यारोहकांनी दिला आहे.
इन्फो
निर्जनस्थळी धोका अधिक...
गेल्या दीड वर्षापासून जंगलात मानवी वावर कमी झाल्याने हिंस्र श्वापदांचा वावर वाढला आहे. त्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येत आहे. झाडेझुडपे वाढल्याने घनदाट अरण्य तयार झाले आहे. काजवा महोत्सव दरवर्षी भंडारदरा परिसरात भरत असतो. यावर्षी मोठ्या संकटाचा सामना पर्यटकांना करावा लागला आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. धबधबे मुक्तपणे ओसंडून वाहायला सुरुवात झाली आहे. हा परिसर पर्यटकांना खुणावत असला तरी निर्जनस्थळी जाणे धोकादायक ठरू शकते.
कोट:
पर्यावरणाचा आस्वाद घेण्यासाठी यावर्षी स्वतःसह परिवाराला निर्जनस्थळी जाणे टाळणे गरजेचे आहे. निसरडे रस्ते, वाढती वनराई यामुळे पर्यटन स्थळावरील धोके वाढले आहेत. माहितीच्या ठिकाणीच जावे. लहान मुलांना शक्यतो जंगलात घेऊन जाणे टाळावे. किल्ल्यावर चढाई करणे यावर्षी जिकरीचे असून काही किल्ल्यांवरील वाटा नष्ट झाल्या आहेत. जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे. धबधब्यावरील संभाव्य धोका वाढल्याने काळजी घेण्याची गरज आहे.
-भगीरथ मराडे, गिर्याराेहक