मालेगाव : तालुक्यातील कंधाणे येथील धनदाई माता डोंगराजवळ चार वर्षाच्या बिबट्याने (मादी) मृत वासराचे मांस खाल्ल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र, विच्छेदनानंतर बिबट्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मृत बिबट्याचे नमुने नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून प्रयोग शाळेच्या अहवालानंतर अज्ञात संशयित आरोपींविरूद्ध वन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला जाणार आहे.कंधाणे परिसरात बिबट्यांनी धुमाकुळ घातला आहे. वनविभागाकडे स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार तक्रार करूनही पिंजरा लावण्यासाठी व्यवस्था केली जात नाही. परिणामी शनिवारी (दि.१७) धनदाई माता डोंगर परिसरात मृत वासरूवर विष टाकण्यात आले. सदर मृत वासराचे मांस बिबट्याने सेवन केल्याने बिबट्या अत्यवस्थ स्थितीत पडून होता. याची माहिती शेतक-यांना मिळाल्यानंतर शेतक-यांनी वन विभागाला या प्रकाराची खबर दिली. वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, वनपाल भानुदास सूर्यवंशी व अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेवून ग्रामस्थांच्या मदतीने अत्यवस्थ बिबट्याला जाळीत पकडले; मात्र लोणवाडे येथील नर्सरीत बिबट्याचा मृत्यू झाला. पशुधन विकास अधिकारी डॉ. शिवाजी घुडगे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केले. विच्छेदनानंतर बिबट्यावर विषप्रयोग करण्यात आल्याचा प्रकार उघकीस आला आहे.
कंधाणेला बिबट्यावर विषप्रयोग,शवविच्छेदनात उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 4:55 PM
मृत वासराचे मांस खाल्ल्याने मृत्यू
ठळक मुद्देमृत वासराचे मांस बिबट्याने सेवन केल्याने बिबट्या अत्यवस्थ स्थितीत पडून होता. याची माहिती शेतक-यांना मिळाल्यानंतर शेतक-यांनी वन विभागाला या प्रकाराची खबर दिली