कसबे सुकेणे (योगेश सगर) : महाराष्ट्राचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील मौजे सुकेणेतील श्याम मोगल या युवा शेतकऱ्याच्या विषमुक्त शेतीचा यशस्वी प्रयोग सध्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने जिल्ह्यासह राज्यात कुतुहूल आणि नावीन्यपूर्ण विषय ठरत आहे. गहू, कांद्यासह अत्यंत जोखमीचे आणि नैसर्गिक वातावरणावर अवलंबून असलेले द्राक्षही विषमुक्त पद्धतीने हा शेतकरी पिकवित असून त्यांच्या विषमुक्त उन्हाळ कांद्याला नुकताच पिंपळगाव बाजार समितीत २ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल असा बाजार भाव मिळाला आहे. मौजे सुकेणे येथील श्याम मोगल हे १९ एकर क्षेत्रावर गेल्या १० वर्षांपासून विषमुक्त शेती करत आहे. मोगल हे पदवीधर शेतकरी आहेत. आधुनिक जीवन शैलीत माणसाची आयुर्मान का कमी झाले, या सारख्या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात मोगल यांनी विषमुक्त शेतीचा प्रयोग त्यांच्या शेतीत राबविला. यासाठी त्यांनी पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची प्रेरणा घेत १० वर्षांपासून नैसर्गिक विषमुक्त शेतीस प्रारंभ केला. प्रगत शेतीची वाट धरताना रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा अमर्याद वापरामुळे विषयुक्त झालेल्या शेतीस विषमुक्त करण्यास मोगल यांना तीन वर्ष लागली. विषमुक्त शेती करताना त्यांनी कांदा, गहू यावर कुठलेही रासायनिक खते, द्रवे, कीटकनाशके, बुरशीनाशकांचा वापर केला नाही. पीक क्षेत्रानुसार प्रमाण करून देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ आणि डाळींचे पीठ, १०० वर्ष वयाच्या वडाच्या झाडाखाली पडलेल्या पक्ष्यांच्या विष्टेची अमृत माती यांचे मिश्रित द्रावण चार दिवस भिजवून तयार झालेले जीवन अमृत ते शेतीत वापरत असल्याची माहिती दिली.
--------------------
कांद्याला ४ हजार २०० रुपये बाजार भाव
सध्याच्या हंगामात मोगल यांनी याच पद्धतीतून विषमुक्त कांदा पिकविला असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये बाजार समितीचे सभापती तथा आमदार दिलीप बनकर, निफाडचे प्रांताधिकारी डॉ.- अर्चना पाठारे, तहसीलदार शरद घोरपडे, डी. बी. मोगल, राजेंद्र मोगल यांच्या उपस्थितीत त्यांच्या कांद्याच्या पहिल्या बैलगाडीतील सात क्विंटल कांद्याचे वाजत-गाजत बाजार समितीच्या आवारात स्वागत झाले. या कांद्यास तब्बल ४ हजार २०० रुपये बाजार भाव मिळाला.
---------------------
आमचे पूर्वज हे विषमुक्त शेती करत. माझ्या घरातील आजी-आजोबा १००हून अधिक वर्ष निरोगी जीवन जगले. मी विषमुक्त शेतीचे धाडस केले. पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर यांची प्रेरणा घेत मी १० वर्षांपासून यशस्वीपणे कांदा, गहू आदींची नैसर्गिक विषमुक्त शेती करतोय - श्याम मोगल, युवा शेतकरी (०३ सुकेणे)
030721\03nsk_20_03072021_13.jpg
०३ सुकेणे १