नाशिक- मखमलाबाद येथे सुमारे ३०६ हेक्टर क्षेत्रात साकारण्यात येणा-या ग्रीन फिल्ड प्रकल्पासाठी शेतक-यांनी केलेला विरोध आणि आक्रमक भूमिका घेतल्यानंतर देखील मंगळवारी (दि.२९) सत्तारूढ भाजपने नगरररचना योजनेच्या प्रारूपास प्रसिध्दी करण्यास अंतिम मान्यता दिली. भाजपच्या उपमहापौर भिकुबाई बागूल यांनीच विरोध करून करून घरचा आहेर दिला तर योजना भलेही मंजुर करा, परंतु चार ते पाच दिवस अभ्यासासाठी तहकूब ठेवा ही विरोधकांची सूचनाही महापौरांनी फेटाळून लावली. या योजनेत ५३ टक्के म्हणजे पन्नास टक्कयांपेक्षा अधिक जमिन मालकांचे समर्थन आहे तसेच शेतक-यांच्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी शासनाने लवाद नियुक्त करण्याची सुविधा आहे आणि सध्या केवळ अंतिम प्रारूप घोषीत करण्यात येणार असल्याने हा स्मार्ट सिटीचा प्रस्ताव मंजुर करण्यात येत असल्याचे यावेळी महापौर सतीश कुलकर्णी यांनी जाहिर केले.महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी गुरूमित बग्गा यांनी प्रारूप आराखड्याच्या सादरीकरणाची मुदत संपुन गेल्यानंतर हा प्रस्ताव मांडण्यात आल्याच आक्षेप घेतला तर महासभेत या टीपी स्कीममध्ये ६० टक्के जागा शेतक-यांना तर चाळीस टक्के स्मार्ट सिटी कंपनीला देण्याचा ठराव करण्यात आला. मात्र, शासनाला पाठविताना ५५:४५ चा फॉर्मुला पाठविण्यात आला, असे अनेक आक्षेपाचे मुद्दे मांडले. तर सुधाकर बडगुजर यांनी भौगोलीक क्षेत्राफळातील गोंधळ सांगताना या ठिकाणी आरक्षण वगळण्यात आले तसेच नदीकाठी निळ्या रेषेतील बांधकामांना समाविष्ट करून लाभ देण्यात आला, ही सुपारी घेऊन कामे करण्यात आल्याचा आक्षेप घेतला. डॉ. हेमलता पाटील यांनी हा शेतक-यांना उध्वस्त करणारा प्रस्ताव असल्याने फेटाळ्याची मागणी केली. विलास शिंदे यांनी शेतक-यांवर शिवसेना अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले. चर्चेत गजानन शेलार, दीक्षा लोंढे,संभाजी मोरूस्कर, जगदीश पाटील, सतीश सोनवणे यांनी सहभाग घेतला.बोधले यांच्या स्पष्टीकरणाने गोंधळस्मार्ट सिटीच्या नगररचनाकार कांचन बोधले यांनी गुरूमित बग्गा यांच्या आक्षेपांचे स्पष्टीकरण दिल्याने गोंधळ उडाला. बग्गा यांनी त्यास आक्षेप घेतला. त्या मुळातच महापालिकेच्या सेवेत नाहीत, त्यांना सभागृहात बोलण्याचा अधिकार नाही, असे सांगून त्यांनी इतिवृत्तातून बोधले यांचे म्हणणे वगळण्याची मागणी केली.