स्मार्ट सिटी कंपनीकडून गावठाण विकासअंतर्गत रस्ते खोदून खालील भागातून पाईपलाईन, भुयारी गटार आणि सर्व्हीस लाईनसाठी डक्ट टाकण्याचे काम सुरु करण्यात आले होते. मूळात कामाला प्रारंभच उशीरा झाला. त्यात खड्डे खोदून झाल्यानंतरही कामाला गती देण्यात आली नाही. तर पावसाळ्याला प्रारंभ झाल्यानंतर गत महिन्यापासून काम जवळपास ठप्पच झाले आहे. त्यामुळे एकीकडे जो थोडाफार व्यवसाय होऊ शकतो, त्यालादेखील या खड्ड्यांमुळे अडथळा निर्माण झाला आहे. या परिसरात ट्रॅफीक जामचे प्रमाणदेखील प्रचंड वाढले आहे. तसेच ड्रेनेज लाईन फुटल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे. तर खोदकाम करुन ठेवलेल्या भागातील काही जुन्या इमारतींच्या खालील माती खाली धसू लागल्याने त्या नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि नागरिकांनी बुधवारी एकत्र येऊन आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला. यावेळी उपस्थित नागरिकांनी मनपा आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभाराविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी बुक सेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पवार, विजय सोमवंशी, अरविंद सोमवंशी, नीलेश कोठारी, सागर मगर, आनंद भट्टड, अशोक करंजकर, जितेंद्र गजभिये तसेच परिसरातील व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.
फोटो
२८व्यापारी आंदोलन