जळगाव नेऊर : निफाड तालुक्यातील नैताळे येथील मतोबा महाराज यात्रोत्सवात जऊळके (ता. येवला) येथील तकतराव रथाला दरवर्षी मान दिला जातो. अनेक दशकांपासून येथील रथाची जऊळके गावात मिरवणूक होऊन रात्री नैताळे गावाकडे प्रस्थान होते. मतोबा महाराजांनी जऊळके गावात मुक्काम करून पुढे नैताळे गावाकडे प्रस्थान केले होते.तसेच मतोबा महाराज मंदिराचे दिवंगत पुजारी रेवजी नाना बोरगुडे जऊळके गावचे जावई होते व आताचे पुजारी नंदू बोरगुडे हे देखील जावई असल्याने या गावात नात्यागोत्याचे संबंध आहे. त्यामुळे जऊळके येथील तकतराव रथाला मानाचे स्थान देण्यात येत असल्याची आख्यायिका सांगितली जाते. यावर्षी मंदिराला सजावट करून रथाला रंगरंगोटी करण्यात आली असून, रथ बांधणीचे काम प्रगतिपथावर असून, रथाला चार बैल जुंपून रथ ओढला जातो. गुरु वारी रात्री मिरवणूक निघणार असून, सात धान्यापासून बनविलेले धपाटे नैवेद्य म्हणून दाखविले जातात. येथील गवंडी कुटुंबाला रथ ओढण्याचा मान दिला जातो, दिवंगत यशवंत गवंडी यांनी अनेक दशके रथ ओढण्याचा मान होता, त्यानंतर त्यांचे चिरंजीव साहेबराव गवंडी हे मतोबा महाराजांचा मान ठेवतात. रथ सजावट करण्यासाठी भाऊसाहेब राजगुरु, भागवत राजगुरु,परसराम दरगुडे, पांडुरंग जाधव, शांताराम सोनवणे, प्रभाकर खैरनार, सुकदेव मोरे प्रयत्नशील आहेत.सालाबादप्रमाणे यावर्षी गुरु वारी (दि.१०) रात्री जऊळके येथे निघणाऱ्या तकतराव मिरवणुकीची तयारी सुरू असून, शुक्र वारी जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती संजय बनकर व सुवर्णा बनकर यांच्या हस्ते नैताळे येथे पूजा होऊन रथ मिरवणुकीला सुरु वात होणार आहे.
जऊळकेच्या तकतराव रथाची परंपरा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 10:36 PM