नाशिक : श्रावण महिन्याला धार्मिकदृष्ट्या अनन्य साधारण असे महत्त्व असून, प्रत्येक श्रावणी सोमवारी महादेव मंदिरात दुग्धाभिषेक, बेलपत्राभिषेक करून शिवमूठ वाहून शिवभक्त श्रद्धापूर्वक पूजन करतात. मात्र यावर्षी कोरोना विषाणूच्या महामारीमुळे श्रावण महिन्याच्या पहिल्या दोन श्रावणी सोमवार प्रमाणेच तिसºया सोमवारीही भाविकांना शिवदर्शन दुर्लभच झाल्याचे दिसून आले. अनेक भाविकांनी घरातच शिवप्रतिमेला अथवा जवळील शिवालयात बेलपत्र अर्पण करून भक्तिभावाने भगवान शिवशंकर महादेवांची पूजा केली. शहरातील प्रसिद्ध श्री सोमेश्वर, श्री कपालेश्वरसह सर्वच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत भाविकांनी भगवान शिवशंकरांना कोरोनामुक्तीसाठी साकडे घातले. त्याचप्रमाणे गोदाकाठावरील लहान-मोठ्या शिवालयांमध्येही सोळा सोमवारच्या व्रताच्या महिलांसह भाविकांनी शिवलिंगाचे पूजन केले. दरवर्षी श्रावण महिना आणि सोमवारी शिवालयांमध्ये बम बम भोले, हर हर महादेवचा गजर होतो. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे तीन महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद असून, केवळ पुजारी मंडळींकडून कोरोना प्रतिबंधात्मक खबरदारी घेत डिस्टन्सिंगचे पालन करीत दररोजचे पूजन अभिषेक केले जात असून, श्रावणाच्या तिसºया सोमवारीही शहरात हीच परिस्थिती पाहायला मिळाली. कोरोनाबाबत शासनाच्या आदेशाचे पालन करीत मंदिरात केवळ पारंपरिक ४ ते ५ पुरोहित व विश्वस्त मंडळाच्या उपस्थित फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत शिवशंकरांचे भक्तिभावाने पूजन व अभिषेक करण्यात आला. त्यामुळे भाविकांनी श्री कपालेश्वर आणि श्री सोमेश्वर मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत भगवान शिवाकडे कोरोनामुक्तीची प्रार्थना केली. दरम्यान, गोदाघाटावर बाणेश्वर आणि मुक्तेश्वर येथील शिवलिंग मोकळे असल्याने तेथे अभिषेक व पूजन करण्यासाठी गर्दी झाली होती.
तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवालयांमध्ये पारंपरिक पूजन ; भाविकांना दर्शन दुर्लभ : घरोघरी बेलपत्र अर्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 6:44 PM
नाशिक शहरातील प्रसिद्ध श्री सोमेश्वर, श्री कपालेश्वरसह सर्वच मंदिराच्या कळसाचे दर्शन घेत भाविकांनी भगवान शिवशंकरांना कोरोनामुक्तीसाठी साकडे घातले. त्याचप्रमाणे गोदाकाठावरील लहान-मोठ्या शिवालयांमध्येही सोळा सोमवारच्या व्रताच्या महिलांसह भाविकांनी शिवलिंगाचे पूजन केले.
ठळक मुद्देश्रावणी सोमवारनिमित्त शिवालयांमध्ये पारंपारिक पूजाश्री कपालेश्वर, श्री सोमेश्वर मंदिरांचे भाविकांनी घेतले कळस दर्शन