नाशिक : सकाळी भर वर्दळीच्या वेळी शहरातील प्रमुख मार्गावरून निघालेल्या मोर्चामुळे वाहतुकीचे तीन तेरा वाजून जागोजागी वाहतूक ठप्प झाली. नागरिकांच्या कामधंद्याची वेळ असल्यामुळे प्रत्येकाच्या घाईची त्यात भर पडल्याने वाहतूक सुरळीत होण्याऐवजी आणखीनच विस्कळीत झाली, ज्यांच्यावर ती सुरळीत करण्याची जबाबदारी होती, ते वाहतूक पोलीस कंबरेवर हात ठेवून बघ्याच्या भूमिकेत शिरल्याने तर नागरिकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला. गोल्फ क्लब मैदानावरून मोर्चा निघणार असल्यामुळे पोलिसांनी जुना त्र्यंबकनाक्याकडून सातपूरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडील रस्त्यावरील वाहतूकही एकेरी वळविली, ज्या ज्या मार्गावरून मोर्चेकरी जाणार होते, ते मार्ग एकतर वाहतुकीसाठी बंद केले, नाही तर एकेरी वाहतूक वळविल्याने मोर्चेकऱ्यांनी निर्विघ्न मार्गक्रमण केले. मात्र हीच वेळ नोकरदार, व्यावसायिकांची महत्त्वाची असल्याने प्रमुख रस्त्यावरील वाहतूक बंदीचा त्यांना फटका सहन करावा लागला. ज्या मार्गावर वाहतूक बंद त्या मार्गाच्या पर्यायी रस्त्यावरही दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्यातून त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची कसरत झाली. विशेष करून पोलिसांनी गडकरी चौकातून वाहतूक वळविल्यामुळे ती मायको सर्कलमार्गे त्र्यंबकरोडने तरणतलाव, टिळकवाडीमार्गे सीबीएसकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्या. अगोदरच डोक्यावर उन्हाचा तडाखा व त्यात मुंगीच्या पावलाने सरकणारी व ठिकठिकाणी विस्कळीत झालेल्या वाहतुकीने नागरिक पुरते बेजार झाले. मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातही हीच परिस्थिती ओढवल्याने काही ठिकाणी हमरी-तुमरीचे प्रकारही घडले. सकाळच्या वेळेत शहरातील प्रमुख मार्ग अशा प्रकारे वेठीस धरले गेल्याने त्याचा ताण साहजिकच उपरस्त्यांवर पडला व गल्लीबोळातही वाहनांचे हॉर्न वाजू लागले. अशोकस्तंभ, मेहेर, महात्मा गांधी रोड, सांगली बॅँक कॉर्नर व शालिमार चौक या ठिकाणी गर्दी झाल्यामुळे ती सुरळीत होण्यासाठी जवळपास तासाचा कालावधी लागला. (प्रतिनिधी)
मोर्चामुळे वाहतुकीचे तीन तेरा
By admin | Published: May 31, 2015 1:36 AM