नाशिक : प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या करवाढीच्या निषेधार्थ सार्वजनिक खासगी वाहतूक दारांसह मालवाहतूकदारांनी चक्का जाम आंदोलन केल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे हाल झाले. सकाळी ११ वाजेपासून चक्का जाम आंदोलनाचा प्रभाव शहरातील विविध रस्त्यांवर पहावयास मिळत होता. सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा वाहतूकदारांनी वाहतूक सेवा बंद केली होती. त्यामुळे रस्त्यांवर रिक्षा नजरेस पडत नव्हत्या. त्यामुळे नागरिकांना प्रवास करताना त्रास सहन करावा लागला. सकाळी रिक्षा व ओम्नीवाल्या ‘काकां’च्या वाहनाचा हॉर्न बहुतांश नाशिककरांच्या कानी पडलाच नाही. (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रिक्षा थांब्यांसह उपनगरीय भागातील रिक्षा थांबेही ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळत होते. त्यामुळे बस थांब्यांवर प्रवासी बसेसच्या प्रतीक्षेत मोठ्या संख्येने उभे होते. बसेसच्या सर्व फेऱ्या सुरळीत सुरू होत असल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रवाशांना मात्र बसेससाठी विविध मार्गांवरील थांब्यावर प्रतीक्षाच करत ताटकळत रहावे लागत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली, तर काही विद्यार्थ्यांनी थांब्यावर थांबून वेळ वाया घालविण्यापेक्षा पायीच शाळा - महाविद्यालयाचा रस्ता धरणे पसंत केले. प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाढविण्यात आलेल्या करवाढीच्या निषेधार्थ सार्वजनिक खासगी शालेय वाहतूकदारांनीदेखील मंगळवारी (दि.३१) ‘दांडी’ मारली. यामुळे सकाळी रिक्षा व ओम्नीवाल्या ‘काकां’च्या वाहनाचा हॉर्न बहुतांश नाशिककरांच्या कानी पडलाच नाही. पालकांनी लवकर तयार होऊन आपल्या पाल्यांना शाळेमध्ये स्वत:च्या वाहनांमधून दाखल केले. ज्या सर्वसामान्य नागरिकांकडे दुचाकी आहे त्यांचे हाल झाले. त्यांना एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यांना दुचाकीवरून शाळेत पोहचवावे लागले. तसेच ज्या नागरिकांकडे वाहने नाही त्यांच्या पाल्यांनाही काही नागरिकांनी शेजारधर्म पाळत शाळांमध्ये नेऊन सोडले. वडाळागावातील नागरिकांना शहरात येण्यासाठी केवळ रिक्षांचा आधार आहे. कारण या गावापर्यंत अद्याप महामंडळाला बससेवा देणे शक्य झालेले नाही. चक्का जाममुळे गावातील सर्वसामान्य नागरिक दुपारनंतरच शहराकडे आले. इन्फो... ज्येष्ठ नागरिकांनादेखील चक्का जाम आंदोलनामुळे गैरसोयीचा सामना करावा लागला. भर उन्हात बसची वाट बघत थांब्यावर ताटकळत उभे रहावे लागले. रिक्षादेखील उपलब्ध होत नसल्यामुळे ज्येष्ठांनी नाराजी व्यक्त केली. सकाळी काही ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरांकडे जाण्याचे नियोजन केले असताना मात्र त्यांना संध्याकाळी भेटीची वेळ निश्चित करावी लागली. कारण सकाळच्या सुमारास रिक्षा बंद होत्या. दुपारी २ वाजेनंतर शहरातील रस्त्यांवर रिक्षा धावताना दिसून आल्या. फोटो- ३१पीएचजेअे -७२/७३/७४/७५
वाहतूकदारांची दांडी; विद्यार्थ्यांची कोंडी
By admin | Published: February 01, 2017 1:44 AM