वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट तपासणी
नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील बिटको कॉलेजसमोर वाहतूक पोलिसांकडून विनाहेल्मेट चालकांवर कारवाई केली जात आहे. त्याचप्रमाणे, कागदपत्रे जवळ न बाळगणाऱ्या चारचाकी चालकांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. गतिरोधकावर वाहनांचे वेग कमी होताच, पोलीस वाहनधारकांना ताब्यात घेत असल्याने पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांची तारांबळ उडत आहे.
रस्त्यावर मोकाट कुत्र्यांचा उच्छाद
नाशिक : जुने नाशिक परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. काही विशिष्ट भागांमध्ये कुत्र्यांच्या झुंडी सकाळी आणि रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून फिरत असल्याने नागरीकांनाही त्यांची दहशत वाटू लागली आहे. मॉर्निंग वॉकच्या वेळी अनेक कुत्र्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. रस्त्यावर टाकलेल्या शिळ्या अन्नामुळे कुत्र्यांचा उच्छाद वाढत चालला आहे.
उद्यानांमध्ये गवत वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव
नाशिक : शहरातील बंद उद्यानांमध्ये गवत वाढल्यामुळे डासांचा उपद्रव वाढला आहे. शहरात नुकत्याच पडलेल्या पावसामुळे अशा बंद उद्यानांमधील डासांचा उपद्रव पुन्हा वाढला आहे. यंदा कोरोनामुळे उद्यानांचे काम हाती घेण्यात आले नसल्याने, वाढलेल्या गवतामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचा ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे.
झाडांच्या फांद्या ठरत आहेत धोकादायक
नाशिक : शहरात नुकत्याच झालेल्या पावसामुळे काही भागात जोरदार वाऱ्यामुळे या झाडांच्या फांद्या पडल्याचे अनेक प्रकार घडले आहेत. या मार्गावर वर्दळ वाढलेली असल्याने लोंबकळणाऱ्या या झाडांंच्या फांद्या धोकादायक ठरत आहेत. झाडांच्या फांद्या तोडण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
अनधिकृत फलकांनी शहराचे विद्रुपीकरण
नाशिक : शहरात विविध ठिकाणी अनधिकृत जाहिरातीचे फलक लावून विद्रुपीकरण केले जात आहे. शहराचा मध्यवर्ती भाग, स्मार्ट रोड, तसेच सर्व विभागातील प्रमुख ऱस्त्यांवर अशा प्रकारे पोस्टर, भित्तीपत्रके लावून विद्रुपीकरण होत आहे. अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सीबीएसला पुन्हा वाहनांचा गराडा
नाशिक : सीबीएसच्या रस्त्यावर नागरिकांकडून दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहने उभी करून ठेवली जातात. त्यामुळे या परिसरातून जाणाऱ्या बस, तसेच अन्य वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागते. बरेचदा वादावादीचे प्रकारही घडतात. त्यामुळे या रस्त्यांवरील या अनधिकृत पार्किंगवर प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्याची मागणी सामान्य नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे.
--------