पेठ (एस.आर. शिंदे) : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांना जोडणारा नाशिक ते पार्डी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ पेठ तालुक्यातून जात असून या महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी कोटंबी व सावळघाटातील रुंदीकरण व पेठ शहरातून जाणारा बायपासचे काम रखडल्यामुळे चांगला रस्ता असूनही वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनधारक मात्र चांगलेच हैराण झाले आहेत.
सध्या पावसाचे दिवस असल्याने सावळघाटातून अवजड वाहने प्रवास करताना अरुंद रस्ता व धोकादायक वळणांमुळे वारंवार अपघात होत आहेत. तर मोठे ट्रेलर अडकल्यामुळे पाच-पाच तास वाहतुकीचा खोळंबा होताना दिसून येतो. घाटातील अवघड वळणावर संरक्षक कठडे नसल्याने चालकाचा ताबा सुटून वाहने थेट दरीत कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशीच काहीसी परिस्थिती कोटंबी घाटात झाली आहे. तीव्र उतार आणी अवघड वळणांमुळे वाहने समोरासमोर टक्कर होत आहेत. पेठ शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हट्टीपाडा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
------------------------------
बायपासअभावी पेठ शहरात कोंडी
गुजरात राष्ट्रीय महामार्ग पेठ शहरातून जात असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यावसायिक दुकाने व दररोजची ग्राहकांची गर्दी यामुळे अवजड वाहनांना शहरातून मार्गक्रमण करताना मोठी कसरत करावी लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणमार्फत बायपास मंजूर असला तरी मशिनरी आणून ठेवण्यापलीकडे बायपासच्या कामाची कोणतीही प्रगती दिसून येत नसल्याने प्रवाशांसह व्यावसायिकांनाही वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
करंजाळी ते हरसूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत
करंजाळी व हरसूल या दोन महत्त्वाच्या बाजारपेठेच्या गावांना जोडणारा रस्ता गत अनेक वर्षांपासून दुरुस्ती व रुंदीकरणाच्या प्रतीक्षेत असून या मार्गावरून प्रवास करताना वाहनासह प्रवाशांचे ही हाडे खिळखिळे झाल्याशिवाय राहत नाही. करंजाळीपासून कोहोर, घनशेत, कुळवंडी, जातेगाव ही मोठी गावे असून प्राथमिक आरोग्य केंद्र, शासकीय आश्रमशाळाही याच मार्गावर असल्याने रुग्णांची वाहतूक करतानाही कसरत करावी लागते. याच रस्त्यावर असलेल्या छोट्या फरशी पुलांवरून पावसाळ्यात पाणी वाहत असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटत असल्याने करंजाळी ते हरसूल रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण व्हावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
-----------------------
दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले
पावसाळ्यात अनेक घाटांमध्ये धोकादायक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले असून संरक्षक कठड्यांसह उपाययोजना करण्याची मागणी केली जात आहे. पेठ ते भुवन, पेठ ते अंधृटे, सावर्णा ते झरी, बाडगी ते डेरापाडा, म्हसगण ते आंबे, पिंपळपाडा ते विरमाळ, दोनावडेचा घाट आदी ठिकाणी पावसाळ्यात दरडी कोसळून रस्त्यावर दगड येत असल्याने वाहतुकीस अडथळे निर्माण होताना दिसून येतात. (२१ पेठ रस्ता)
210821\21nsk_1_21082021_13.jpg
२१ पेठ रस्ता