पिंपळगाव बसवंत : ‘ते ’ येणार म्हणून कार्यकर्ते दोन दिवसांपासून तयारीला लागले. ठिकठिकाणी स्वागताचे फलक, पक्षाचे झेंडे लावले, ड्रोन कॅमेरा, ढोल पथक, फटाके सज्ज ठेवले. ते आले मात्र रस्त्यावरच थांबले. गाडीतच सत्कार स्वीकारला. खिडकीतून हात बाहेर काढून कार्यकर्त्यांना नमस्कार करत पुढे निघून गेले. मात्र तोपर्यंत मुंबई-आग्रा महामार्गावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली अन् वाहतूक काहीकाळ खोळंबली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे रविवारी ( दि २ ) धुळे येथून रात्री आठ वाजता पिंपळगाव बसवंत येथे आगमन झाले. शहरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील चिंचखेड चौफुली परिसरात मनसे कार्यकर्त्यांची फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशाच्या गजरात त्यांचे जोरदार स्वागत केले. राज ठाकरे येणार म्हणून दोन दिवस आधीच कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी स्वागताचे फलक, झेंडे लावले, ढोलताशा पथक, फटाके, ड्रोन कॅमेरा आदींची जय्यत तयारी केली होती. राज ठाकरे यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मात्र ठाकरे यांनी आपल्या गाडीतूनच काच खाली करत सत्कार स्वीकारला. खिडकीतून हात उंचावून कार्यकर्त्यांना नमस्कार करून पुढे निघून गेले. ठाकरे यांना पाहण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आधीच चिंचखेड चौफुलीवर उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. मार्केटला टमाटा व कांदा वाहनांची गर्दी त्यातच राज ठाकरे यांचा सत्कार याचा फटका वाहनधारकांना बसला. गर्दीमुळे परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली. या गर्दीचा फायदा घेत काही संधीसाधू चोरांनी नागरिकांच्या खिशावरही डल्ला मारल्याची चर्चा ऐकावयास मिळाली. मुंबई-आग्रा महामार्गावरील शगून लॉन्स परिसरात ५ वाजेपासूनच मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.चिंचखेड चौफुलीवर राज ठाकरे यांच्या सत्कार समारंभास पिंपळगाव बसवंत पोलिसांनी कोणतीही परवानगी दिलेली नसताना कार्यकर्त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केल्याने पोलीस आता काय भूमिका घेतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरे यांच्या सत्कारामुळे वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:38 AM