नाशिक (सुयोग जोशी) : सीबीएस ते कॅनडा कॉर्नरदरम्यानच्या रस्त्याच्या कामामुळे शुक्रवारी दिवसभर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे चारचाकी-दुचाकी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागला. महापालिकेतर्फे मॉडेल रोडसाठी अधिसूचना जारी करत रस्ताकामासाठी पोलिस अधीक्षक बंगल्यापासून शरणपूर रोड सिग्नलपर्यंत रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने यापूर्वी अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान उभारलेल्या स्मार्ट रोडच्या कामाचा अनुभव नागरिकांना पुन्हा एकदा येणार असून, आगामी काळात नागरिकांना या त्रासाला सामोरे जावे लागणार असल्याचे चिन्ह आहे.
अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा स्मार्ट रस्ता उभारण्यात आला खरा, मात्र त्यात सध्या कोणताही स्मार्टपणा उरलेला दिसत नाही. तेथील फूटपाथ सर्रास पार्किंगसाठी वापरले जात आहेत, तर तेथील गतिरोधकदेखील अपघातांना आमंत्रण ठरत आहेत. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानक ते शरणपूर रोड हा मॉडेल रस्ता उभारताना त्याची पुनरावृत्ती व्हायला नको, अशी अपेक्षा नाशिककर व्यक्त करत आहेत.
महापालिकेने २०२३-२४ या आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात या रस्त्यासाठी २६ कोटी रुपयांची तरतूद केली असून, २ कोटी रुपये पहिल्या टप्प्यात खर्च केले जाणार आहेत. दीड वर्ष या रस्त्याचे काम सुरू राहणार आहे. हे काम करताना वाहनधारकांना व या परिसरातील नागरिक, व्यावसायिकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता या रस्त्याचे काम टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. सध्या तालुका पोलिस ठाणे ते राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाच्या अलीकडे रस्त्याचे वन-वेचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे.
काम टप्प्याटप्प्याने-
पोलिस अधीक्षक यांच्या बंगल्यापासून शरणपूर रोड सिग्नलपर्यंत एकेरी वाहतूक करण्यात आली. दुपारी उन्हामुळे वाहनांची वर्दळ कमी होती. मात्र सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. सीबीएस ते कॅनडा कॉर्नर रस्त्याचे काम बांधकाम विभागाने टप्प्याटप्प्याने हाती घेतले आहे.