मुंबई-आग्रा महामार्गावरील के.के. वाघ महाविद्यालय ते हॉटेल जत्रा दरम्यान उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले असून, दोन्ही पूल एकमेकांना जोडणीचे काम सुरू आहे. त्यासाठी मे महिन्यापासून उड्डाणपुलावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. पुलाच्या जोडणीबरोबरच पुलावर चढण्या-उतरण्यासाठी रॅम्पचे कामही प्रगतिपथावर असून, पुलावर स्ट्रीट लाइट, रेलिंग व काही ठिकाणी रॅम्प व मुख्य पुलाच्या जोडणीचे काम बाकी आहे. या सर्व कामांसाठीच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे त्याचा ताण पुलाखालील समांतर रोड व महामार्गावर पडत असून, विशेषकरून द्वारका ते पंचवटी दरम्यान जागोजागी वाहतुकीची कोंडी होऊन लहान-मोठे अपघात घडू लागले आहेत. महामार्गावरील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी पोलिसांना कसरत करावी लागत असल्याने पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाकडे लकडा लावला आहे. ३१ जुलैअखेर उड्डाणपुलाचे काम पूर्ण होईल, असे अगोदर जाहीर करण्यात आले होते. तथापि अजूनही बरेचसे काम बाकी असल्याने तूर्त आहे त्याच परिस्थितीत वाहतुकीचा प्रश्न कायम राहणार आहे.
उड्डाणपूल जोडणीच्या कामासाठी दीड महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. त्याची मुदत संपुष्टात आली असल्याने वाहतूक पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाला पत्र पाठवून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे तसेच काम पूर्णत्वासाठी मुदतवाढ घेण्याची सूचना केली आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या मते ऑगस्टअखेर पुलाचे काम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरक्षितरीत्या पार पडू शकते यासाठी सेफ्टी विभागाकडून चाचणी झाल्यानंतरच पूल वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो.
चौकट====
उड्डाणपुलाची मुख्य जोडणी पूर्ण झाली असली तरी, त्यातील काही तांत्रिक बाबींची पूर्तता बाकी आहे. रेलिंग, रॅम्प, पथदीपाचे कामही केले जात आहे. पुलावरून सुरक्षित वाहतूक होऊ शकते याची अद्याप चाचपणी बाकी असल्याने ही सारी कामे ऑगस्ट महिन्यात पूर्ण केली जातील. त्यानंतरच वाहतुकीसाठी पूल खुला होईल.
- दिलीप पाटील, व्यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण