दिंडोरी : तालुक्यातील रवळगाव परिसरातील शेतकरी रंगनाथ अमृता भोई हे आपल्या शेतात सोमवारी पाइपलाइनसाठी चारी खोदत होते. नदीच्या कडेला चारी खोदत असताना त्यांना ब्रिटिशकालीन सर्व्हिस डिवायडर तोफगोळा आढळून आला. त्यांनी ही माहिती दिंडोरी पोलीस ठाण्याला दिली. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला, उपनिरीक्षक रंजवे, मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल बोरसे, बोकड, शेलार, भरसट आदिंच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मालेगाव येथील बॉम्बशोध पथकाला पाचारण करण्यात आले. बॉम्बशोध पथकाचे भगीरथ सोनवणे व त्यांचे साथीदार यांनी तोफगोळ्याची तपासणी केली असता त्यात दारू नसल्याचे व तो निकामी असल्याचे आढळून आले. पुढील कार्यवाहीसाठी देवळाली येथील आर्टिलरी सेंटरमध्ये तो गोळा पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांनी दिली. परिसरात तुंगलदरा याठिकाणी ब्रिटिशकाळात तोफेच्या गोळ्याची फायरिंग केली जात असल्याची माहिती येथील ज्येष्ठ नागरिक सांगत आहे. त्यातीलच हा तोफगोळा असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)
रवळगाव येथे सापडला तोफगोळा
By admin | Published: February 01, 2016 11:45 PM