नाशिक : फें्रडशिप दिनाचे आलेले भरते आणि पावसाने घेतलेली विश्रांती यामुळे तरुणाईचा उत्साह संध्याकाळी अधिकच द्विगुणित झाला. कॉलेजरोडवर सेलिब्रेशनसाठी तरुणाईची गर्दी लोटल्याने मॉडेल कॉलनीपासून कॅनडा कॉर्नरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आणि कर्णक र्कश हॉर्नचा गोंगाट कॉलेजरोडवर सुरू झाला.वाहतूक कोंडीमध्ये हॉर्नचा वापर करण्याची काहीच गरज नाही कारण हॉर्न वाजविल्यामुळे वाहने पुढे सरकतील आणि कोंडी सुटेल हा केवळ गैरसमज आहे. मात्र, याबाबत नागरिक फारसे गांभीर्याने न घेता ‘हॉर्न बजाने की बिमारी’ झाल्यासारखे केवळ ध्वनिप्रदूषणामध्ये वाढीसाठी आपले योगदान देताना दिसून येतात. असेच चित्र रविवारी (दि.७) संध्याकाळी कॉलेजरोडवर बघावयास मिळाले. कॉलेजरोड नावातच उच्चशिक्षितांचा परिसर असल्याचे अधोरेखित होते. उच्चशिक्षित आणि उच्चभ्रू लोक ांची वसाहत म्हणून शहरातील कॉलेजरोड, गंगापूररोड हा भाग ओळखला जातो. तरीदेखील वाहतूक कोंडी या भागात होते हे विशेष! विविध हॉटेल्स, चॅटची दुकाने असून मैत्री दिनाच्या पार्ट्यांसाठी तरुणाईची झुंबड उडाली होती. तसेच रविवार असल्याने अन्य खरेदीसाठीही सायंकाळी नागरिक घराबाहेर पडल्यामुळे जवळपास सर्वच दुकानांपुढे चारचाकी, दुचाकी वाहनांची गर्दी होती. यामुळे कॉलेजरोड जणू बेशिस्तरोड झाल्याचे चित्र होते. सायंकाळी पाच वाजेपासूनच तरुणाईचा उन्माद या ठिकाणी सुरू होता. काही दिवसांपूर्वीच तरुणाईच्या उन्मादाला समाजभानचे धडे देण्यासाठी प्राध्यापकांना रस्त्यावर उतरून मानवी साखळी करत आंदोलन करावे लागले होते. (प्रतिनिधी)
कॉलेजरोडला ट्रॅफिक जाम
By admin | Published: August 08, 2016 1:00 AM