लोकमत न्यूज नेटवर्कनिफाड : रेल्वेस्थानक येथील रेल्वे गेट बंद पडल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सदर रेल्वे गेटमध्ये तांत्रिक बिघाड हा नित्याचाच झाला असून, त्यामुळे हजारो प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. मुंबई - भुसावळ असा रेल्वेमार्ग असलेल्या निफाड रेल्वे स्टेशनचे गेटची तार तुटल्याने दुपारी १२.३०च्या दरम्यान बंद झाल्यामुळे गेटच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या. विशेष निफाड -पिंपळगाव बसवंत मार्ग गुजरातहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांचा मार्ग असल्याने या मार्गावर खूप रहदारी असते. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त शिर्डी येथे जाणाऱ्या गुजरातच्या भाविकांच्या गाड्या गेटच्या पश्चिम बाजूला अडकून पडल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. तसेच पिंपळगावला कांदा घेऊन जाणारे ट्रॅक्टर, पिकअप, शालेय बस, विद्यार्थी, नागरिक अशा अनेक प्रवाशांचे हाल झाले. दुचाकीस्वार रेल्वेपुलाच्या खालून नदीपात्रातून तर काही लोक गेट खालून जीव धोक्यात घालून पर्यायी मार्गाने वाहन काढून मार्गस्थ होत होते. अनेक लोक रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे संताप व्यक्त करत होते.
रेल्वे गेट बंद पडल्याने वाहतूक ठप्प
By admin | Published: July 08, 2017 10:51 PM