मनमाड : मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदौर - पुणे राज्य महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे आत्तापर्यंत अनेक अपघात झाले आहेत. शुक्रवारी (दि. १७) दुपारी मनमाड बसस्थानकासमोर मालेगावकडे माल घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये असलेल्या गोण्यांची थप्पी अचानक रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
शहरातून जाणाऱ्या इंदोर - पुणे राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्डे चुकवताना अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर आत्तापर्यंत अनेकांनी जीव गमावले असून, काहींना अपंगत्व आले आहे. तर वारंवार वाहनेही खराब होऊन त्यांचे नुकसान होत आहे. याच खड्ड्यांमुळे येथील बसस्थानकासमोर दूध पावडर घेऊन जाणाऱ्या ट्रकने खड्डा चुकवताना अचानक ब्रेक दाबला असता, ट्रकमध्ये उंच असलेली गोण्यांची थप्पी खाली पडली. यावेळी पाठीमागे कुठलेही वाहन अथवा दुचाकीस्वार नसल्यामुळे दुर्घटना टळली. तर गोण्या खाली पडल्यामुळे ट्रकही जागेवरच थांबवावा लागल्याने एका बाजूने वाहतूक कोंडी झाली होती. चालकाने हमालांना बोलावून खाली पडलेल्या गोण्या तातडीने ट्रकमध्ये भरल्यानंतर तो मार्गस्थ झाला.