भाजीपाल्याची आवक घटली
नाशिक : सततच्या पावसामुळे शेतातून भाजीपाला काढणे शक्य होत नसल्याने नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांना माल मिळणे जिकिरीचे बनले आहे. काही ठिकाणी पावसामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
गर्दीमुळे कोरोना नियमांकडे दुर्लक्ष
नाशिक : शासनाने निर्बंध शिथिल केल्याने बाजार समित्यांमध्ये मालविक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी होऊ लागली आहे. यामुळे कोरोना नियमांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार होत आहे. बाजार समिती प्रशासन आपापल्यापरीने काळजी घेत असले तरी नागरिकांनीही नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
दुकानदारांकडून काळजी घेण्याचा प्रयत्न
नाशिक : बाजारपेठा सुरू झाल्यानंतर दुकानदारांना प्रशासनाच्यावतीने काही नियम घालून देण्यात आले असून काही दुकानदार काटेकोरपणे या नियमांचे पालन करून दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायझेशन देणे, गर्दी होऊ न देता योग्य अंतरावर ग्राहकांना उभे करणे याकडे हे दुकानदार काळजीपूर्वक लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्येही समाधान व्यक्त केले जात आहे.
अनेकांच्या लसीकरण केंद्रावर चकरा
नाशिक : कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना लसीकरणाबाबत नागरिकांमध्ये जागृती झाल्याने लस घेण्यासाठी दररोज अनेक जण लसीकरण केंद्रांवर गर्दी करत आहेत. अनेक केंद्रांवर अद्याप पुरेशी लस उपलब्ध होत नसल्याने अनेकांना चकरा माराव्या लागत आहेत. विशेषत: यात ज्येष्ठ नागरिकांचा अधिक समावेश असल्याचे दिसते.
पेरणीसाठी पुरेशा पावसाची प्रतीक्षा
नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खरिपाच्या मशागतीची तयारी जवळपास पूर्ण झाली असून, आता शेतकऱ्यांना पुरेशा पावसाची प्रतीक्षा आहे. यावर्षी हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मान्सूनपूर्व पावसाने मशागतीची कामे करण्यात काही काळ अडथळा आला असला तरी आता त्या कामांना गती आली आहे.
बाजार समित्यांमध्ये कांदा आवक टिकून
नाशिक : जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक टिकून असून सध्या उन्हाळ कांद्याला १७०० ते १८०० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांना खरिपासाठी भांडवल उभे करण्यास मदत होत असून थोड्याफार प्रमाणात काही ठिकाणी कांदा दरात चढउतार होत असल्याचे दिसून येत आहे. बहुसंख्य ठिकाणी सरासरी भाव सारखेच आहेत.