व्यायामशाळा बहरू लागल्या
नाशिक : जिल्ह्यातील व्यायामप्रेमी पुन्हा व्यायामशाळांकडे, जिमखान्याकडे परतू लागल्याने व्यायामशाळा बहरू लागल्या आहेत. सकाळी सहापासूनच व्यायामशाळांमध्ये व्यायामप्रेमी नागरिक येऊ लागल्याने अनेक दिवसांपासून बंद पडलेली व्यायामाची उपकरणेदेखील वापरात येऊ लागली आहेत.
हेल्मेट तपासणी सुरू
नाशिक : कोरोनाचा कहर कमी होऊ लागताच शहरात आणि शहराच्या परिघात वाहतूक पोलिसांकडून नागरिकांच्या हेल्मेट तपासणीला सुरुवात झाली आहे. विना हेल्मेट फिरणाऱ्या दुचाकीचालकांना थांबवून त्यांच्याकडे विचारणा करण्यात येत असून, हेल्मेट न घातलेल्या नागरिकांकडून दंडदेखील वसूल केला जात आहे.
छत्री, रेनकोटचा बाजार थंडच
नाशिक : शहरात जूनच्या प्रारंभापासूनच पावसाळा सुरू झाला असला तरी छत्री आणि रेनकोट विक्रीला वेग आलेला नाही. दुकानदारांनी दरवर्षीप्रमाणे यंदा दुकानांबाहेर मोठ्या प्रमाणात छत्र्या, रेनकोट टांगून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला असला तरीही पूर्वीच्या तुलनेत अद्यापही बाजार थंडच असल्याचे दिसून येत आहे.
फांद्या छाटणीच्या कामाला वेग
नाशिक : शहरातील विविध रस्त्यांवरील तारांवर, विजेच्या खांबांपुढे आलेल्या झाडांच्या फांद्या छाटणीच्या कामाला वेग देण्यात आला आहे. त्यासाठी मनपाच्यावतीने आवश्यकतेनुसार लहान-मोठ्या क्रेन्सचा वापर करण्यात येत आहे.
मास्क विक्रीत पुन्हा घट
नाशिक : कोरोनाचे प्रमाण घटू लागल्यानंतर मास्क आणि सॅनिटायझर विक्रीच्या प्रमाणात पुन्हा घट होऊ लागली आहे. लस घेतलेल्या नागरिकांची संख्या वाढल्याने तसेच कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने मास्कच्या विक्रीतही घट येऊ लागली आहे. मास्कचा वापर बंधनकारक असला तरी आता मास्कच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट येऊ लागली आहे.
शहरातील खड्डे त्वरित बुजविण्याची मागणी
नाशिक : पावसाळ्याच्या प्रारंभीच महानगरातील विविध रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांनी अनेक ठिकाणी, चौकांमध्ये रस्त्यांची रया गेली आहे. आता पावसाने विश्रांती घेतली असल्याने महापालिकेने शहरातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या कामाला वेग देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
पुन्हा भाजी विक्रेत्यांमुळे अडथळे
नाशिक : दिंडोरी रोड, पेठ रोड परिसरात भाजी विक्रेत्यांनी पुन्हा रस्त्यांलगत दुकाने लावल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या भागात संध्याकाळी भाजी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहन चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.