सिन्नर : नाशिक - पुणे महामार्गावर मोहदरी घाटात भरधाव जाणारा अवजड कंटेनर उलटून अपघात झाला. प्रवासी व टोलनाका व्यवस्थापनाच्या तत्पर प्रयत्नांनंतर चालकाचे प्राण वाचविण्यात यश आले. क्लिनर किरकोळ जखमी झाला. यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.गुरुवारी (दि. ११) दुपारी ४ वाजेच्या सुमारास कंटेनरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. कंटेनर माळेगाव औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यातून मुंबईकडे निघाला होता. मोहदरी घाटातील वळणार नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजकावर आदळून उलटला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गायाकवाड, नाईक प्रवीण मासोळे, तुषार मरसाळे, गोविंद खुळे यांच्यासह महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक केबिनमध्येच दबला गेला होता.क्रेनच्या साहाय्याने अर्धा तासांच्या प्रयत्नानंतर त्याला सुखरुप बाहेर काढून उपचारांसाठी खासगी दवाखान्यात पाठविण्यात आले. अर्धा ते पाऊण तास नाशिककडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.
कंटेनर उलटल्याने मोहदरी घाटात वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 9:30 PM