पंचवटी : पेठरोडवर भाजीविक्रेत्यांनी रस्त्यालगत दुकाने थाटल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या भागात संध्याकाळी भाजीखरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने वाहन चालवितांना चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या भागातील रस्त्यावर भरणारा भाजीबाजार नियंत्रित करण्याची मागणी होत आहे.
बाजार समिती आवारात विनामास्क वावर
पंचवटी : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात अनेकजण मास्कविना वावरत असल्याने कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. या ठिकाणी जिल्हाभरातून येणाऱ्या शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी काटेकोरपणे मास्क सक्तीची अंमलबजावणी करण्याची मागणी होत आहे. त्याचप्रमाणे मास्क न वापरणाऱ्यांवर दडात्मक कारवाई करण्याचीही मागणी होत आहे.
अनधिकृत फलकांनी शहराचे विद्रुपीकरण
नाशिक : विविध ठिकाणी जाहिरातींचे अनधिकृत फलक लावून शहराचे विद्रुपीकरण केले जात आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नाशिकच्या सौंदर्याला यामुळे बाधा निर्माण होत आहे. त्यामुळे अशाप्रकारे पोस्टर, भित्तिपत्रके लावून विद्रुपीकरण होत असल्याने अशा अनधिकृत फलक, पोस्टरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
दुभाजकातील बोगनवेलीचा वाहतुकीस अडसर
पाथर्डी फाटा : इंदिरानगर-पाथर्डी रस्त्यावर ठिकठिकाणी बोगनवेल वाढल्याने त्याचा वाहतुकीस अडथळा होत आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी या बोगनवेलींच्या बुंध्यांमधे कचरा फेकण्याचे प्रकारही दिसून येत आहे. दुचाकीचालकांना या वेलींच्या फांद्या लागून दुखापत होण्याची शक्यता असल्याने वेलींची छाटणी करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.