नाशिकरोड : महामार्ग रुंदीकरणात पाइपलाइन टाकण्यासाठी खोदण्यात आलेली चारी बुजविण्यात न असल्याने या खड्ड्यात ट्रक अडकून पडल्याने वाहतूक कोंडी झाली. सिन्नरफाटा ते सिन्नरपर्यंत नाशिक-पुणे महामार्ग रुंदीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले होते. महिन्याभरापूर्वी महामार्ग रुंदीकरणाच्या कामामुळे सिन्नरफाटा पोलीस चौकीसमोर पाण्याची मोठी पाइपलाइन टाकण्यासाठी महामार्गावर आडवे खोदून पाइपलाइन टाकण्यात आली. पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यावर माती टाकून बुजविण्यात आले होते. मात्र वाहतुकीच्या मोठ्या वर्दळीमुळे वारंवार वाहने जाऊन पाइपलाइन टाकून ज्या ठिकाणी बुजविण्यात आले होते, त्या ठिकाणी खोलगट खड्डा पडल्याने येणारी -जाणारी वाहने आदळतहोती.रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचून मुरले होते. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणारा दहाचाकी अवजड ट्रकच्या पाठीमागील चाके त्या खटकीमध्ये अडीच-तीन फूट खोल जाऊन रुतला.यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेच्या सुमारास रुतलेली ट्रक काढल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली. पाइपलाइन टाकण्याकरिता महामार्गावर आडवे खोदाई करण्यात आल्याने धोकादायक खटकी निर्माण झाली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्या ठिकाणी तातडीने मजबुतीकरण करून डांबरीकरण करावे, अशी मागणी वाहनधारक व रहिवाशांनी केली आहे. (प्रतिनिधी)
ट्रक फसल्याने वाहतूक कोंडी
By admin | Published: May 10, 2016 10:47 PM