मालेगाव : शहरातील प्रमुख मार्ग असलेला मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंतच्या रस्त्यामध्येच रिक्षा, दुचाकी आदी वाहने, फळ विक्रेत्यांच्या हातगाड्या उभ्या केल्या जात असल्याने या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होऊन जनतेस मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गासह किदवाई रोड, सरदार चौक, रामसेतू आदी प्रमुख मार्गांवरदेखील वाहतूक कोंडी होत असल्याने या रस्त्यांवरील वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब तसेच वाहनांना त्वरित हटवावे, अशी मागणी राष्टÑवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. जयंत पवार यांनी केली आहे.प्रमुख मार्गांवर बेशिस्त वाहने व हातगाड्या लावण्यासह रस्त्याच्या मधोमध उभारण्यात आलेल्या पथदीपांमुळे वाहतूक कोंडीचे प्रकार घडत आहे. वाहतूक कोंडी निर्माण करणारे अडथळे दूर करण्यात यावे, मोसमपूल ते टेहरे चौफुली तसेच इतर प्रमुख रस्त्यांच्या मधोमध असलेले पथदीप व रोहित्र, रिक्षा व हातगाड्या लावल्या जात असल्यामुळे सदर प्रमुख मार्ग या अतिक्रमणांमुळे अरूंद झाल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होऊन जनतेस त्रास सहन करावा लागत आहे. मोसमपूल ते टेहरे चौफुली, रावळगाव नाका ते चर्चागेट, सोमवार बाजार, शहरातील सरदार चौक, किदवाईरोड, नवीन बसस्थानक आदी प्रमुख मार्गांवरदेखील अशीच परिस्थिती असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसागणिक गंभीर बनला आहे. या मार्गावर अनेक रुग्णालये आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास वाहने कर्णकर्कश आवाज करतात, त्याचा त्रासदेखील रुग्णांना होत आहे. शहरातील प्रमुख मार्गांची अशीच अवस्था निर्माण झाली असून, त्याकडे मनपा व पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष जनतेत असंतोष निर्माण करणारे ठरत असल्याने संबंधित विभागांनी वाहतुकीस अडथळा ठरणारे विजेचे खांब त्वरित दूर करावेत. मोसमपूल ते टेहरे चौफुली या मार्गावर दिवसरात्र वाहतुकीची वर्दळ असते; मात्र रस्त्याच्यामध्ये असलेले पथदीप व ट्रान्सफार्मर, बेशिस्तपणे उभी केली जात असलेली वाहने व हातगाड्यांमुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडीचे प्रकार वाढले आहेत. दुपारी व सायंकाळी या मार्गावर सतत वाहतूक कोंडी होत असते. यामुळे अपघाताचे प्रकारदेखील वाढून अनेकांना जायबंदी व्हावे लागले आहे. वाहतूक शाखेचे कार्यालय हाकेच्या अंतरावर असताना बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे टाळले जाते.
मोसमपूल ते टेहरे चौफुलीपर्यंत वाहतूक कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 12:17 AM