नाशिक : बेशिस्त वाहतुकीमध्ये होणारी वाढ आणि वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी नाशिक शहर वाहतूक पोलिस रस्त्यावर उतरले आहे. झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल जम्प करणे, डावे वळणाच्या दिशेने सिग्नलवर वाहने थांबविणे, हेल्मेटचा वापर न करणे, वेगमर्यादा न पाळणे आदि वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा दणका दिला. शहरातील रहदारीच्या चौकांमध्ये सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सकाळीच आरंभली. यावेळी वाहतूक पोलिसांनी बेशिस्त दुचाकीस्वारापासून तर चारचाकी वाहनचालकांवरही कारवाई केली. यावेळी काही शासकिय अधिकाऱ्यांनी थेट झेब्रावरच वाहने उभी केल्यामुळे त्यांनाही दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागला यावेळी महामंडळाच्या एसटी चालकांवरही कारवाई करण्यात आली.शहरातील सर्व प्रमुख चौकांमध्ये नव्याने झेब्रा पट्टे, स्टॉप लाईन आखण्यात आली असून त्या ठिकाणी ‘स्टॉप ’ लिहिण्यात आले आहे. यामुळे झेब्रा पट्ट्यांच्या अलिकडे स्टॉपलाईनला वाहने उभी करण्याची शिस्त वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना लावली जात आहे. याबरोबरच दुचाकीस्वारांना हेल्मेट वापरणे कायद्याने बंधनकारक असून हेल्मेटची टाळाटाळ करणाऱ्यांनाही दंड भरावा लागत आहे. सहायक पोलीस निरिक्षक सुरेश भाले, एम.जी.बागुल, गणेश ढाकणे आदिंनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
वाहतूक पोलिसांकडून नाशिककरांना शिस्त : हजारोंचा दंड वसूल
By admin | Published: March 22, 2017 1:46 PM