याबाबत अधिक माहिती अशी, ईस्टर्न रेल्वेत नोकरीला लावून देतो असे सांगून टीसी पदाची गव्हर्न्मेंट ऑफ इंडियाच्या नावाने बनावट ऑर्डर तयार करून संशयित गोसावी व म्हस्के या जोडगोळीने दोन सुशिक्षित बेरोजगारांना सुमारे १८ लाखांना ‘चुना’ लावल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी हनुमानवाडीत राहणाऱ्या बाबाजी रामजी केदारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या दोन संशयितांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित आरोपी गोसावी व म्हस्के यांनी नोव्हेंबर २०१४ ते मे २०१६ या कालावधीत केदारे व त्यांचा नातेवाईक स्वप्निल महेंद्र बागुल यांना विश्वासात घेऊन त्यांना ईस्टर्न रेल्वेत टीसी पदावर नोकरीला लावून देतो, असे सांगून त्यांच्याकडून वेळोवेळी १८ लाख रुपये घेऊन त्यांना गव्हर्न्मेंट ऑफ इंडियाच्या नावाने ‘टीसी’चे बनावट नियुक्तीपत्र दिले. फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता अशाप्रकारे कुठल्याही पदाची भरती सुरू नसल्याची त्यांची खात्री पटली आणि आपली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.