नाशिक- संततधार पावसामुळे कॉलेजरोडवर एका बाजूने अक्षरश: नदी वाहू लागल्याने वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सकाळपासून कॅनडा कॉर्नर ते एचपीटी कॉलेजची एक बाजू बंद करण्यात आली असून एकेरी मार्गानेच वाहतूक सुरू आहे.
सामान्यत: शहरातील पश्चिम भागात गंगापूररोडनजीकचा भाग वगळता अन्य भागात पावसाचा फार त्रास होत नाही. मात्र यंदा पावसामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले आहे. एचपीटी कॉलेज ते कुलकर्णी चौक सिग्नल पर्यंत पाणी आहेच. परंतु कुलकर्णी चौक सिग्नलमध्ये पाण्याचे मोठे तळे साचल्याने येथील सिग्नल देखील बंद करावा लागला. याशिवाय पुढे कॅनडा कॉर्नय पर्यंत अक्षर: नदी वाहात असल्याने हा रस्ता बंद करण्यात आला आहे. कॅनडा कॉर्नर येथेच बॅरेकेड टाकण्यात आले असून महापालिकेने जेसीबी लावून पाण्याचा निचरा करण्याचे काम सुरू केले आहे. बिग बाजार समोर पाण्याचा फुगवटा झाल्याने दुभाजक फोडून पाणी प्रवाही करण्यात येत आहे.
याभागातील विसे मळा आणि अन्य नाले बंदीस्त झाल्याने दरवेळीच या मार्गावर पाणी साचू लागले असून आसावरी चेंबर भागात देखील तळे साचले आहे. महापालिकेच्या राजीव गांधी भवनासमोरच सकाळी तळे साचले तसेच तळघरातील दुकांनामध्ये पाणी गेले होते. मात्र महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चेंबर्सची झाकणे हटवून पाणी प्रवाही केले. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.