नाशिक : शहरात वाहतूक नियंत्रित करण्यासाठी होमगार्डच्या धर्तीवर ट्रॅफिक वॉर्डनची व्यवस्था करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, लवकरच प्रस्ताव तयार करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी पाठविणार असल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिली. राज्यामध्ये होमगार्डच्या धर्तीवर ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करण्याबाबत आमदार जयवंत जाधव यांच्या मागणीनुसार राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी डॉ. रणजीत पाटील यांनी सदर माहिती दिली. बैठकीप्रसंगी बोलतांना जयवंत जाधव यांनी सांगितले, राज्यामध्ये मुंबई, पुणे, नांदेड, जळगाव, रायगड, लातूर, कल्याण, भंडारा इत्यादी शहरांमध्ये ट्रॅफिक वॉर्डन हे मासिक मानधनावर वाहतूक पोलिसांना मदतीचे काम करत आहेत. नाशिक शहरातसुद्धा पोलीस महासंचालकांच्या हस्ते ओळखपत्र वितरित करून ट्रॅफिक वॉर्डन योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला होता. त्यांना ट्रॅफिकचे नियम आणि कायदेविषयक माहितीचे प्रशिक्षणही देण्यात आलेले होते. मात्र २००९ नंतर ही योजना शहरात बंद करण्यात आली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. चर्चेनंतर डॉ. रणजीत पाटील यांनी सांगितले, नाशिक शहरामध्ये ट्रॅफिक वार्डनची सेवा देता येणे शक्य आहे. त्यासाठी लवकरच ट्रॅफिक वॉर्डनची गरज लक्षात घेऊन त्यांच्या नियुक्तीसंदर्भात प्रस्ताव तयार करून गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दंडाच्या वसुलीतून मानधननाशिक शहराचा वाढता विस्तार, वाढती लोकसंख्या व वेगाने वाढणारी वाहनांची संख्या यांचा विचार करून, वाहतुकीच्या नियमनासाठी ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती करून या कर्मचाºयांना ट्रॅफिक विभागातील दंडाच्या वसुलीतून मानधन देण्यात यावे, अशी मागणी आ. जयवंतराव जाधव यांनी यावेळी केली.
नाशकात होमगार्डच्या धर्तीवर ‘ट्रॅफिक वॉर्डन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:00 AM