कोरोना नियमांकडे अनेकांचे दुर्लक्ष
नाशिक : लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच, वाढलेल्या गर्दीमुळे कोरोना नियमांचा फज्जा उडत असून, अनेक नागरिक मास्क न लावताच गर्दीत फिरत असल्याचे दिसून येत आहे. अनेक दुकानदारांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी अद्याप धोका टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.
पेट्रोलचे दर वाढल्याने नाराजी
नाशिक : पेट्रोलच्या दरात सातत्याने वाढ हात असल्याने, सर्वसामान्य वाहन चालक त्रस्त झाले आहेत. यामुळे अनेकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या मध्यमवर्गीयांना महिन्याचे आर्थिक गणित सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. केंद्र शासनाने पेट्रोलचे दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोरोनामुळे छोटे व्यवसाय डबघाईस
नाशिक : मागील महिन्याभरापासून व्यवसाय बंद असल्याने, अनेक छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय डबघाईस आले असून, त्यांच्यासमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्यांनी नव्यानेच व्यवसायाला सुरुवात केली होती, त्यांना तर व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय उरला नाही. अनेक जण आता पर्यायी रोजगाराच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.
रस्त्यांची काम पूर्ण करण्याची मागणी
नाशिक : शहरातील अनेक रस्त्यांवर वेगवेगळ्या केबल्स टाकण्यासाठी रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. काही मार्गांवर तर अनेक महिन्यांपासून ही काम सुरू आहेत. रात्रीच्या वेळी खड्डे दिसले नाहीत, तर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना महापालिकेने संबंधितांना द्याव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.
इच्छुकांची मनपा निवडणुकांची तयारी
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकांसाठी अनेकांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून, जनसंपर्कासाठी वेगवेगेळे पर्याय हाताळले जात आहेत. कोरोनाच्या काळातही काही इच्छुकांच्या तयारीत खंड पडला नाही. अनेकांनी या काळातही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. यामुळे महापालिका निवडणूक चुरशीची ठरेल, असा अंदाज वर्तविला जात आहे.