नाशिकरोड : रेल्वे प्रशासनाकडून येत्या एक जूनपासून ‘कोविड स्पेशल’ २०० रेल्वे सोडण्यात येणार असल्याने त्यासाठी आरक्षणाला सुरुवात करताच शुक्रवारी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर पहिल्या दिवशी ७५ प्रवाशांनी आपले रेल्वे तिकीट आरक्षण केले.कोरोनामुळे राज्यात परप्रांतीय, मजूर, कामगार आदींची संख्या मोठी असल्याने त्यांची गरज लक्षात घेऊन केंद्र शासनाने रेल्वे प्रशासनाला एक जूनपासून देशाच्या विविध भागांत जाण्यासाठी २०० रेल्वे सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नाशिकरोडला लांबपल्ल्याच्या मुंबईहून येणाऱ्या व जाणाºया ११ गाड्या थांबणार आहेत. त्यांच्या आरक्षित तिकिटांची विक्री शुक्रवारी सकाळी ८ वाजता आरक्षण कार्यालयातून सुरू झाली. हे कार्यालय दररोज सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहणार असून, जे प्रवासी महाराष्ट्राच्या बाहेरील राज्याचे रेल्वे आरक्षण तिकीट काढणार आहे, त्यांनाच ते आरक्षण तिकीट मिळणार आहे. राज्यातल्या राज्यात प्रवास करू इच्छिणाऱ्यांना आरक्षण मिळणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे. ज्येष्ठांना रेल्वे प्रवासात मिळणारी सवलत सध्या स्थगित केली आहे. नाशिक रोड रेल्वेस्थानकाच्या सिन्नर फाटा आरक्षण केंद्रातून पहिल्या दिवशी शुक्रवारी फक्त ७५ प्रवाशांनी आपले आरक्षण तिकीट घेतले आरक्षण तिकीट देताना रेल्वे कर्मचारी फिजिकल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, हँडग्लोज, मास्क आदी खबरदाºया घेत आहेत. नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधक आर. के. कुठार, वरिष्ठ वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, आरक्षण कार्यालयाच्या प्रमुख ए. एस. सुराळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट विक्री सुरू आहे.
पहिल्याच दिवशी ७५ प्रवाशांना रेल्वेचे आरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 10:09 PM