नाशिक : वन क्षेत्रात एखादी चोरी शोधण्यासाठी श्वांनाचा वापर केला जात असला तरी आता गेल्या दोन वर्षांपासून या श्वानांचा वापर अन्य कारणांसाठीदेखील केला जात आहे. केवळ श्वापदांचा शोधच नव्हे, तर दुर्मीळ प्रजातींच्या प्राण्यांचा माग आणि पायाभूत विकास करताना वनातील प्राण्यांच्या क्षेत्राचे संवर्धन व्हावे यासाठीही त्यांचा वापर केला जात आहे. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांत वन विभागासाठी अशा प्रकारच्या अनेक सेवा पुरवणाऱ्या वाइल्ड लाइफ काँझर्व्हेशन ट्रस्टच्या माध्यमातून ही सेवा देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या श्वानांना प्रशिक्षित करून प्रत्यक्ष त्यांच्याकडून काम करण्याची जबाबदारी नाशिकच्या युवकावर असून वाइल्ड लाइफ बायोलॉजीस्ट असलेले किरण रहाळकर हे या पथकाचे प्रमुख म्हणूनदेखील काम करीत आहेत. मानव आणि श्वापदांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. जंगले कमी झाल्याने शहरात येणारे बिबट्या, गवे असो अथवा एखाद्या अभयारण्यात वाघांच्या हल्ल्यात घडलेली दुर्घटना अनेक घटना सध्या गाजत आहेत. त्यातच तस्करी हा सध्या भेडसावणारा प्रकार आहे. सध्या वनखात्याच्या माध्यमातून तस्करांचा शोध घेण्यासाठी श्वानांचा वापर केला जातो. त्यासाठी त्यांच्याकडे प्रशिक्षित श्वानदेखील आहेत. मात्र, वाइल्ड लाइफ काँझर्व्हेशन ट्रस्टच्या माध्यमातून काम करताना दोन श्वानांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना उपयोगात आणले जात आहे. प्राण्यांची गणना करताना त्यांच्या दृश्यस्वरूपातील पाऊलखुणा तसेच विष्ठेचा आधार घेतला जातो. मात्र, श्वान हेच काम केवळ वासाने करू शकतो. एखाद्या माणसाने आसपासच्या जागेत नजरेने बघितले तर त्याची नजर जाईल त्याच्या पलीकडे काही पट अधिक श्वान बघू बघतात. त्यामुळे त्यांचा वापर करणे सोपे आहे. याशिवाय जमिनीखाली घर करणारे प्राणी असोत अथवा अन्य कोणत्याही प्राण्यांना स्वतंत्रपणे हे श्वान शोधतात. माणसाच्या अवलंबित्वाची त्यांना गरज नसते, असे खास प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.
या कामासाठी जर्मन आणि बेल्जिअमचे दोन खास श्वान संस्थेनेे खरेदी केले आहेत. चार श्वानांपैकी दोन वायमरनायमर आणि जर्नन दाेन बेल्जियम मेलानाइट या अशा जातीचे ते असून त्यांना खास दक्षिण आफ्रिकेतील प्रशिक्षकांनीदेखील प्रशिक्षण दिले आहे. महाराष्ट्रात प्राण्यांच्या शोधासाठी त्यांचा वापर करण्यात आला. मात्र, मध्यप्रदेशात जंगलात एक्स्प्रेस-वे करताना श्वापदांच्या जाण्या-येण्याचा मार्ग कोणता हे बघून त्या मार्गावर प्राण्यांसाठी अंडरपास तयार करण्यासाठी या श्वानांचा वापर करण्यात आल्याचे किरण रहाळकर सांगतात.
इन्फो
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे श्वानांचा मुक्काम
- नागपूर आणि मुंबईतील एकंदर वातावरण बघता हे चारही श्वान त्र्यंबकेश्वर येथील रहाळकर यांच्या शेतघराच्या परिसरातच मुक्कामाला आहेत.
- या श्वानांना प्रशिक्षण देण्यासाठी दीड ते दोन वर्षे प्राथमिक शिक्षणासाठी कालावधी लागतो. नंतर नवीन प्रशिक्षण द्यायचे असेल, तर सहा ते सात आठवडे पुरेसे ठरतात.
- श्वापदांच्या शाेधकामात त्यांचा यापूर्वी चांगला वापर झाला आहे. सध्या खवल्या मांजरांंचा शोध घेऊन त्यांच्यावर संशोधन करण्यासाठी या श्वानांचा वापर केला जात आहे.
इन्फो...
दोन वर्षांपूर्वी हे डॉग युनिट सुरू करण्यात आले. विदेशात वन संवर्धनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन श्वानांचा वापर केला जातो. मात्र, भारतातील हे पहिलेच डॉग युनिट आहे. मानव- प्राणी संघर्षात त्यांचा चांगला वापर झाला आहे.
-किरण रहाळकर, वन्यजीवशास्त्रज्ञ