नाशिक : नाशिकच्या वैद्यकीय महाविद्यालयातून नुकतीच वैद्यकीय पदवी प्राप्त केलेल्या ९ शिकाऊ डॉक्टर्सना पहिली लस घेण्यासाठीदेखील नागरिकांकडून धक्काबुक्की, मानहानीकारक शब्द सहन करण्याची वेळ शनिवारी आली.
शासन आदेशानुसार सर्व लसी या खासगी, धर्मादाय रुग्णालयांतून शासकीय रुग्णालयात हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. त्यामुळे त्या आदेशानुसार या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील लसींचा साठादेखील जिल्हा रुग्णालयाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळेच १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांना लसीची परवानगी मिळूनदेखील या शिकाऊ डॉक्टर्सना लस मिळू शकली नव्हती. दरम्यान, ७ मेपासून या सर्व शिकाऊ डॉक्टर्सना आता इंटर्न म्हणून त्यांच्याच महाविद्यालयात त्यांना कोविड वॉर्डमध्येदेखील ड्युटी लावण्यात आली. अशावेळी पहिले त्यांना लस घेऊन काही प्रमाणात तरी सुरक्षित होणे आवश्यक आहे. म्हणून या शिकाऊ डॉक्टर्सनी शनिवारी सकाळपासून जिल्हा रुग्णालयाबाहेर लस घेण्यासाठी रांगा लावल्या. मात्र, त्यांची ड्युटीची वेळ येऊनदेखील त्यांना लस मिळू न शकल्याने त्यांनी रांगेतील पुढील नागरिकांना लस घेऊन कोविड ड्युटीवर जाऊ देण्याची विनंती केली. त्यात ६ युवती आणि ३ युवा शिकाऊ डॉक्टर्सचा समावेश होता. मात्र, त्या रांगेतील अनेक नागरिकांनी या शिकाऊ डॉक्टर्सशी बाेलताना प्रारंभी अर्वाच्च भाषा वापरली. तरीदेखील या डॉक्टर्सनी त्यांना परिस्थिती समजावून सांगत आम्हाला कोविड ड्युटीवर तत्काळ रुजू होणे गरजेचे असल्याने फक्त लवकर लस घेऊ द्यावी, अशी विनंती केली. तरीही कुणीच ऐकून घेण्यास तयार नव्हते. काही नागरिकांनी तर थेट धक्काबुक्की करीत त्यांना बाहेर जाण्यास सांगितल्याने या युवा डॉक्टर्सनादेखील काय करावे, ते सुचेनासे झाले होते.
इन्फो
नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण होऊन डॉक्टर झालेल्यांना शासन नियमानुसार एक वर्ष शासकीय रुग्णालयांमध्ये सेवा देणे बंधनकारक असते. सध्याच्या परिस्थितीत अशा शिकाऊ डॉक्टर्सना लस मिळून मगच त्यांच्याकडून कोविड रुग्णांसाठी सेवा बजावली जाणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांनाच लस उपलब्ध होत नसल्याने कोविड वॉर्डमध्ये वावरताना त्या प्रत्येक शिकाऊ डॉक्टरच्या जीवाशीच खेळ होत असल्याची भावना या शिकाऊ डॉक्टर्सनी व्यक्त केली.