नाशिक : नव्यानेच निवडून आलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे घेऊन त्यांना शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येते. जिल्हा परिषदेने मात्र तीन वर्षांनंतर सर्व १४६ पंचायत समिती सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केल्याने आता उर्वरित दोन वर्षांत काय योजना मार्गी लावणार, असा प्रश्न पंचायत समिती सदस्यांमधून करण्यात येत आहे.राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्णातील १४६ पंचायत समिती सदस्यांसाठी १९ जानेवारी ते २९ जानेवारीदरम्यान टप्प्या-टप्प्याने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शहरालगतच असलेल्या हॉटेल आय होप येथे या निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असले तरी पंचायत समिती सदस्यांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था मात्र व्यवस्थित नसल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. एका रूममध्ये दोन सदस्यांची निवासाची सोय असताना प्रत्यक्षात एकेका रूममध्ये तीन तीन पंचायत समिती सदस्यांची व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप माजी पंचायत समिती सभापती व विद्यमान उपसभापती अनिल ढिकले यांनी केला आहे. या प्रशिक्षण शिबिरासाठी ६ लाख ३५ हजारांची तरतूद असल्याचे कळते. तसेच आता तीन वर्ष उलटल्यानंतर पंचायत समिती सदस्यांना प्रशिक्षण दिल्याने उर्वरित दोन वर्षांत काय योजना राबविणार व तसेच पुढील वर्षी आरक्षण व नव्याने निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे.
प्रशिक्षणाचा खर्च ‘पाण्यात’; तीन वर्षांनंतर केले आयोजन
By admin | Published: January 30, 2015 12:14 AM