पंचवटी : विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची वाहतूककरणाऱ्या वाहन चालकांसाठी ‘विद्यार्थी सुरक्षितता व अपघातविरहित वाहतूक’ याबाबत एप्रिल महिन्यात उजळणी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे़ नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय व नाशिक फर्स्ट यांच्या संयुक्त विद्यमाने चिल्ड्रन ट्राफिक पार्क मध्ये हे उजळणी प्रशिक्षण वर्ग होणार आहे़ एप्रिल महिन्यात आठवड्यातील सोमवारी, बुधवारी, गुरुवारी व शुक्रवारी या दिवशी सकाळी ११ ते १ व दुपारी २ ते ४ या वेळेत हे प्रशिक्षण दिले जाणार असून, सहभागी वाहनचालकांना प्रशिक्षण पूर्ण केल्याबाबतचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतील स्कूल बस, खासगी स्कूल व्हॅनचालकांना दोन तासांचे उजळणी प्रशिक्षण व समुपदेशन एका दिवशी घेणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व त्यांच्याकडील कंत्राटी स्कूल बस, परवाना प्राप्त खासगी वाहतूक करणाºया सर्व स्कूल व्हॅनचालकांनी त्यांच्या सोयीच्या दिवशी प्रशिक्षणासाठी नोंदणी करून उजळणी प्रशिक्षण पूर्ण करून प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, विनय अहिरे यांनी केले आहे. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी शासनाने स्कूल बस अधिनियम २०११ नुसार नियमावली केली आहे. नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालय परिक्षेत्रात सुमारे १ हजार ८०० स्कूल बसेसला विद्यार्थ्यांची वाहतूक करण्याचे परवाने देण्यात आले आहेत. सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी वाहनचालकांना नियमांची माहिती व्हावी, यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व नाशिक फर्स्ट संस्थेचे अनुभवी प्रशिक्षक विनामूल्य हे प्रशिक्षण देणार आहेत.
स्कूल बसचालकांसाठी प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:42 AM