सिडको : आर्थिकवादातून चुंचाळे शिवारातील दत्तनगरमध्ये इंद्रावती रामधन चौहान (४५, दत्तनगर कारगील चौक) या परप्रांतीय महिलेच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना मंगळवारी (दि़२०) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़ या खून प्रकरणी अंबड पोलिसांनी महिलेचा नातेवाईक संशयित मुरारी सीताराम चौहान (२६, गाजीपूर उत्तर प्रदेश सध्या राहणार दत्तनगर) यास अटक केली आहे़अंबड पोलीस ठाण्यात ज्योती रामधन चौहान (२०, रा़ दत्तनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मुरारी चौहान हा इंद्रावती चौहान यांचा आतेभाऊ असून, तो अंबड परिसरात मासेविक्रीचा व्यवसाय करतो़ त्यास इंद्रावती यांनी दुचाकी वापरण्यास दिली होती, मात्र तो दुचाकीचे हप्ते भरीत नसल्याने त्याच्याकडून दुचाकी परत घेतली होती़ या गोष्टीचा राग संशयित मुरारीच्या मनात होता़ मध्यरात्रीच्या सुमारास मुरारी हा घरी आला व इंद्रावतीशी वाद घालू लागला़ या दोघांमध्ये वाद वाढल्याने संशयित मुरारी याने मासे कापण्याच्या कोयत्याने इंद्रावतीच्या मानेवर वार केले व ज्योती चौहान यांनाही मारण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर मुरारी फरार झाला़ पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर परप्रांतीय असलेल्या मुरारीचा नाशिकरोड रेल्वेस्थानक, कसारा रेल्वे स्टेशन या ठिकाणी शोध सुरू केला़ यानंतर मोबाइलचे लोकेशन घेतले असता तो सिडको परिसरातील एका मारुती मंदिर परिसरात असल्याचे समोर आले़ अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड व त्यांच्या सहकाऱ्यांनी या मंदिर परिसरातून संशयित मुरारी चौहान यास ताब्यात घेतले़ त्याच्यावर खून तसेच जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आर्थिकवादातून परप्रांतीय महिलेचा खून
By admin | Published: September 21, 2016 12:48 AM