नाशिक : महापालिकेच्या मेनरोड येथील विभागीय कार्यालयाची पडझड सुरू झाली असल्याने द्वारका येथे हे कार्यालय स्थलांतरित करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. द्वारका येथे मोक्याच्या जागेवर महापालिकेच्या मालकीचा अडीच एकर क्षेत्राचा भूखंड असून, तेथे व्यापारी संकुल आणि प्रशासकीय कार्यालय साकारावे, अशी मागणी पूर्व विभागातील नगरसेवकांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना मंगळवारी (दि.३०) निवेदनाद्वारे केला.महापालिकेची इमारत ब्रिटिशकालीन असून, ती जीर्ण होत चालली आहे. या इमारतीत महापालिकेच्या पूर्व विभागीय कार्यालय असून, तेथे घरपट्टी आणि पाणीपट्टी भरण्याबरोबरच अन्य प्रशासकीय कामकाज चालते. इमारत धोकादायक असून, त्याचा काही भाग कोसळल्याने भीतीचे वातावरण आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन दिले.मेनरोड येथील इमारत शंभर वर्षे जुनी असून, अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेले आहेत. सोमवारी (दि.२९) इमारतीचा काही भाग कोसळला त्यातून जीवितहानी झाली नसली तरी भविष्यात धोका संभवतो. विशेषत: हा बाजाराचा परिसर असून, इमारतीत नागरिक मोठ्या प्रमाणात ये-जा करतात.त्यामुळे महापालिकेच्या द्वारका येथील अडीच एकर जागेत व्यापारी संकुल आणि पूर्व विभागासाठी प्रशासकीय इमारत साकारल्यास दोन्ही प्रश्न मार्गी लागू शकतील, असे नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना राहुल दिवे, सुषमा पगारे, श्यामला दीक्षित, डॉ. दीपाली कुलकर्णी, समिना मेमन तसेच अजिंक्य गिते यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते.दुरुस्ती करावी : पाटीलमेनरोडवरील मनपाच्या जुन्या इमारतीत साडेतीनशे कर्मचारी काम करतात तसेच पाचशे लोकांचा राबता असतो. त्यामुळे इमारतीचा काही भाग कोसळला तरी मोठी जीवितहानी होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल आॅडिट करावे आणि इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी माजी सभागृहनेता दिनकर पाटील यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.
विभागीय कार्यालय द्वारका येथे स्थलांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:46 AM