लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे व पेसा क्षेत्रात शंभर टक्के अनुशेष भरण्याची शासनाची असलेली सक्ती पाहता, जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्यास व्यवस्थापन कोलमडण्याची भिती व्यक्त करून शासनाने बदल्या करण्याची सक्ती न करण्याची भूमिका प्रशासन व पदाधिका-यांनी घेवून मंगळवारी आरोग्य व पाणी पुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदल्या ऐनवेळी रद्द केल्या आहेत. अशा बदल्यांमुळे बिगर आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात असमतोल निर्माण होवून कामकाज ठप्प होण्याची शक्यता असल्यामुळेच बदल्या शासनाच्या संमतीने बदल्या रद्द करण्यात आल्या असून, अन्य विभागात देखील अशाच प्रकारे असमतोल निर्माण झाल्यास त्या बदल्यांचे देखील आदेश निर्गमीत करण्यात येणार नसल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी सांगितले.
जिलहा परिषदेच्या आरोग्य व ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कर्मचा-यांच्या बदली प्रक्रियेत बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात बदली केल्यास मोठा असमतोल निर्माण होत असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाने याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन या दोन्ही विभागांच्या बदल्या न करण्याचा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत २८ मे पासुन विविध विभागामधील बदली पात्र कर्मचा-यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मंगळवारी आरोग्य विभागातील कर्मचा-यांसाठी बदली प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र बदली प्रक्रिया केल्यास बिगर आदिवासी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होणार असल्याने प्रशासनाने बदल्या न करण्याचा निर्णय घेतला. आरोग्य विभागांतर्गत बिगर आदिवासी क्षेत्रासाठी ११४६ पदे मंजुर आहेत. त्यापैकी ४७१ पदे भरलेले असून तब्बल ८२० पदे रिक्त आहेत. आदिवासी क्षेत्रात ९७७ पदे मंजुर असून ७४९ पदे भरण्यात आलेली आहेत. तर २२८ पदे रिक्त आहेत. शासनाच्या निर्देशानुसार आदिवासी क्षेत्रातील १०० टक्के पदे भरणे बंधनकारक आहे. मात्र अशा परिस्थितीत बदली प्रक्रिया राबविल्यास आदिवासी भागातील पदे भरली जातील मात्र बिगर आदिवासी भागातील पदे मोठया संख्येने रिक्त होणार आहेत. त्यामुळे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करुन बदली प्रक्रिया रदद करण्याचा निर्णय घेण्यात आला.ग्रामीण पाणी पुरवठा विभागात देखील आठच कनिष्ठ अभियंत्यांची पदे मंजुर असून, बदल्या केल्यास त्यातील दोन पदे बिगर आदिवासी भागात वर्ग करावे लागतील, त्यामुळे संपुर्ण जिल्ह्यासाठी अवघे सहा पदे असतील. तसे झाल्यास व्यवस्थेवर ताण पडेल. सध्या जिल्हयात दुष्काळी परिस्थिती व पाणी टंचाई असल्याने या विभागातील बदल्याही थांबविण्यात आल्या आहेत.